👁 6 Views

राहुरी: चोरट्यांचा आता मंदिरांच्या तिजोऱ्यांवर डोळा

 

राहुरी: राहुरी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कायद्याला पायदळी तुडवित अवैध धंदे जोमाने सुरू आहे.


तसेच पोलिस प्रशानाच्या नाकावर टिच्चून दैनंदिन चोर्‍या, महिलांच्या गळ्याती दागिणे ओरबाडून नेणे, भरदिवसा घरात चोर्‍या होणे प्रकार नित्याचेच घडत असताना चोरट्यांनी आता धार्मिक स्थळांवर आपली नजर टाकत तिजोर्‍या फोडण्याची किमया सुरू केली आहे.

राहुरी शहरातील कानिफनाथ चौक येथे पहाटेच्या वेळी अज्ञात तीन चोरट्यांनी कानिफनाथ मंदिराच्या तिजोरीला लक्ष केले. कानिफनाथ मंदिराची तिजोरी फोडून चोरट्यांनी 15 हजार रुपयांची रक्कम लांबविल्याचा प्रकार घडला. चोरटे सीसीटिव्हीमध्ये कैद होऊनही पोलिसांचा तपास धिम्या गतीने सुरू असल्याचे दिसले आहे.


21 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी भक्त गणेश शिंदे यांनी कानिफनाथ मंदिरात पूजा केली. त्यानंतर मंदिराच्या दरवाज्याला कुलूप लावले. दुसर्‍या दिवशी पहाटे 4 च्या दरम्यान तीन चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडले. दानपेटी फोडून त्यामधील पंधरा हजाराची रोख रक्कम चोरल्याचे सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहे. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गणेश मच्छिंद्र शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी नेहमीप्रमाणे पाहणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

हा प्रकार घडत नाही तोच चोरट्यांनी राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे कारखाना कार्यस्थळावरील अराध्य दैवत नागेश्वर मंदिराची दानपेटी फोडत काही वस्तू लांबविल्याची घटना घडली. राहुरी शहरातील घटनेप्रमाणेच चोरट्यांनी नागेश्वर मंदिरात किमया दाखविली. 27 फेब्रुवारी सकाळी दैनंदिन पूजा विधी करण्यासाठी सुनिल काळे गुरू व दहीभाते गुरू हे मंदिरात गेले असता त्यांना चोरीची माहिती समजली. चोरट्यांनी नागेश्वर मंदिराची तिजोरीला लक्ष्य करताना मंदिरातील वस्तुही चोरून नेल्याचा प्रकार परिसरात समजताच संताप व्यक्त करण्यात आला.


कानडगाव येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले शेरपीरखाँवली दर्गाह येथे कुलूप तोडून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला होता. ग्रामस्थांनी सीसीटिव्ही पाहणी केल्यानंतर आरोपी समजला होता. त्याबाबत दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष रशिद अब्दुल करीम सय्यद यांच्या तक्रारीनुसार आरोपी गिताराम गंगाराम शिंदे यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राहुरी परिसरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडत आहे. राहुरीत पोलिस निरीक्षक पदावर खमक्या अधिकारी लाभत नसल्याचे चित्र आहे. काही ना काही कारणास्तव अधिकार्‍यांच्या बदल्याचे प्रकार घडत आहे. वर्षाला अधिकारी बदलत असताना दुसरीकडे गुन्हेगारांच्या वर्चस्वामुळे राहुरी हद्दीत पोलिस कर्मचारी नामधारी ठरत आहे. कायद्याचे राज्य नामशेष होत असून कायद्यायचे हा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. गुन्हेगारीवर अंकूश मिळविण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांचे नियोजन कुचकामी ठरत आहे.

महिला अत्याचारात वाढ
राहुरी हद्दीमध्ये महिलांची असुरक्षितता वाढली आहे. शहरामध्ये काही दिवसांपूर्वीच दोन बहिणींना कोयत्याचे धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. अल्पवयीन मुली, तरूणी व विवाहीत महिलांच्या गुन्ह्यांची वाढती संख्या चिंताजनक आहे. सर्वसामान्य, व्यापारी अडचणीत असताना राहुरीत महिला असुरक्षित असल्याचे चित्र आहे.

जिल्हा बँकेचे सुरक्षा रक्षक नामधारीच
डॉ. तनपुरे कारखाना हद्दीमध्ये जिल्हा बँकेचा ताबा आहे. बँकेकडून सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले आहे. सुरक्षारक्षकाच्या निगराणीत राहुरी फॅक्टरी येथे चोरट्यांनी नागेश्वर मंदिराची तिजोरी फोडली. जिल्हा बँकेचे सुरक्षारक्षक नामधारी असल्याने तनपुरे कारखाना असुरक्षिततेत आला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *