पुजारी खून खटल्याचा आज निकाल

8 May. 2017

08 मे : सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी खून खटल्याचा निकाल आज (सोमवारी) देण्यात येणार आहे. गेली 7 वर्षे या खटल्याची कोर्टात सुनावणी सुरू होती. नयना पुजारी खून खटल्यामुळे पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या कोर्टात हा निकाल देण्यात येणार आहे.
सिनिक्रॉन कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत असलेल्या नयना पुजारी हिचे अपहरण करून आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिचा निघृण हत्या केली होती. या प्रकरणी योगेश अशोक राऊत, राजेश पांडुरंग चौधरी, महेश बाळासाहेब ठाकूर, विश्वास हिंदुराव कदम या चौघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
8 ते 9 आॅक्टोबर 2009 रोजी ही घटना घडली होती. या घटनेनंतर आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
या खटल्याची सुनावणी कोर्टात सुरू असताना मुख्य आरोपी योगेश राऊत ससून हॉस्पिटलमधून पळून गेला होता. त्यामुळे खटल्याच्या सुनावणीवर परिणाम झाला होता. त्यानंतर राऊतला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा गजांआड केले. राऊतला पळून गेल्याच्या प्रकरणात कोर्टाने सहा वर्षे शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यात आरोपी राजेश चौधरी याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे जबाब नोंदवण्यात आला होता. बचाव पक्षातर्फे त्यावर हायकोर्टात हरकत घेण्यात आली होती. मात्र हाय कोर्टाच्या आदेशानंतर चौधरी माफीचा साक्षीदार होण्यावर शिक्कामोर्तब झाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *