👁 10 Views

दानवेंच्या तोंडाला काळं फासणा-याला 50 हजारांचं बक्षीस – मनसे

मुंबई, दि. 12 – ‘तूर खरेदी केली तरी रडतात साले’ असे शेतक-यांचे अवहेलना करणारे वक्तव्य केल्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर चहुबाजूंनी टीका सुरू आहे. सर्वच स्तरातून दानवेंवर हल्लाबोल करण्यात येत आहे. यात आता मनसेच्या महिला आघाडीनंही दानवेंवर टीका करत, ‘दानवेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला तब्बल 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल’, अशी घोषणा मनसेच्या महिला आघाडीनं केली आहे.

‘शेतकऱ्यांबाबत अवमानकारक वक्तव्य करुन त्यांची निंदा करणाऱ्या सत्ता पिपासू व मुजोर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल’, अशी घोषणा नवी मुंबईतील मनसेच्या महिला आघाडीने केली आहे.

‘दानवेंच्या तोंडातून येणारी वाक्य ही सत्ताधाऱ्यांना आलेला माज असून रावसाहेब दानवेंची तात्काळ प्रदेश अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी. अन्यथा नवी मुंबईत रावसाहेब दानवेंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही.’, असा इशाराही नवी मुंबई महिला सेना उपशहर अध्यक्ष आरती धुमाळ यांनी दिला आहे.

(कानउघाडणीनंतर दानवेंची दिलगिरी)

‘तूर खरेदी केली तरी रडतात साले’ या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी चांगलीच कानउघाडणी केल्यानंतर दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तो (‘साले’) शब्द आपण शेतकऱ्यांना उद्देशून म्हटलेला नव्हता, असे स्पष्टीकरणही त्यांनी केला. दानवेंच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद गुरुवारी राज्यभरात उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेचेही कार्यकर्ते दानवेंच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले.

(दानवेंवरुन सेना-भाजपात जुंपली, डोंबिवली सेना शहरप्रमुखाला फासलं काळं)

सूत्रांनी सांगितले की, दानवेंचे वक्तव्य देशभरातील वृत्तपत्रे आणि चॅनेल्सनी ते दाखवल्यानंतर त्याची गंभीर दखल भाजपाच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी घेतली आणि दानवेंना दिलगिरीचे पत्रक काढण्यास सांगण्यात आले. दानवेंनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून खुलासा केला. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनीही त्यांना दिलगिरी व्यक्त करण्याची सूचना केली. त्यानंतर दुपारीच त्यांचा ‘दिलगिरीनामा’ जारी करण्यात आला.

या दिलगिरीनाम्यात दानवे यांनी म्हटले आहे की, भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जालना येथील पक्ष कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये ग्रामीण भागात जाऊन शेतक-यांशी संवाद साधणे व तो शेतात जाऊन साधणे, अशा प्रकारची चर्चा झाली. परंतु एका कार्यकर्त्याकडून तुरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर तुरीच्या संदर्भात सरकारची भूमिका मी त्यांना समजावून सांगितली आणि केंद्र सरकारने पुन्हा एक लाख टन तूर खरेदीसाठी मान्यता दिल्याचे मी कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. अशामध्ये माझा आणि कार्यकर्त्यांचा हा संवाद आहे. यामध्ये मी शेतक-यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नाही. मी स्वत: शेतक-याच्या पोटी जन्म घेतला आहे. शेतक-यांचे दु:ख मला माहिती आहे. शेतक-यांची बाजू घेत सतत 35 वर्ष मी राजकारणात आहे. त्यामुळे मी शेतक-यांबद्दल कधीही अपशब्द वापरू शकत नाही. माझ्या आणि कार्यकर्त्यांच्या संवादाला शेतक-यांशी जोडू नये. परंतु यावरही शेतक-यांची मनं दुखावली गेली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे दानवे यांनी म्हटले आहे.

दानवेच राहू द्या – पवार

रावसाहेब दानवे भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर राहणे हे विरोधकांच्या फायद्याचे आहे. उगाच त्यांच्यावर कारवाईची मागणी कशाला करता? असा मार्मिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी लगावला.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *