👁 8 Views

आता आंबेगावचा निवडणुकीवर बहिष्कार

ग्रामपंचायतीचा ठराव : महापालिका हद्दीत समावेशाचा विषय
पुणे – महापालिका हद्दीत लगतच्या ज्या गावांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्या गावांनी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. गुरूवारी आंबेगाव खुर्द ग्रामपंचायतीनेच ठराव करुन निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
हद्दीलगतची 34 गावे पालिकेत समाविष्ट करुन घेण्यासंदर्भात राज्य शासनाने अनुकूलता दर्शविली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी येत्या महिनाभरात काही गावे समाविष्ट केले जातील, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात पुणे महापालिका हद्दीलगत आणि जी गावे आगामी काळात पालिकेत समाविष्ट होणार, अशा ग्रामपंचायतींचा सुध्दा समावेश आहे. यासंदर्भात या गावातील कृती समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी आमदार योगेश टिळेकर व आमदार जगदीश मुळीक तसेच भीमराव तापकिर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निवडणुका रद्द करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. हा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जातो. त्यामुळे हा रद्द करता येणार नाही. पण जर गावांनीच निवडणुकांवर बहिष्कार टाकला तर मात्र निवडणूका रद्द होऊ शकतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर मात्र ज्या गावांमध्ये निवडणूका आहेत त्यांनी बहिष्कार टाकण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. या संदर्भात काल उत्तमनगर ग्रामपंचायतीने सुद्धा ठराव करुन बहिष्कार टाकला त्यानंतर आता आंबेगाव खुर्दने सुध्दा याबाबतचा ठराव करुन बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ग्रामसभा घेण्यात आली. या सभेमध्ये हा ठराव करण्यात आला व सर्वनुमते संमत करण्यात आला. या गावामध्ये येत्या 27 मे रोजी निवडणुका होणार होत्या. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुध्दा सुरु झाली आहे. पण, आज झालेल्या ठरावानुसार कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करु नयेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *