सरपंचासह सतरा जणांवर गुन्हा; अतिक्रमणविरोधी मोहिमेवेळी श्रीरामपूरमधील घटना
हट्टाला पेटलेले पुढारी अन् कायद्याचा बडगा दाखवत त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांना अतिक्रमण काढताना माणुसकीचा गहिवर आला नाही. त्यामुळे ६९ वर्षांच्या गळिनब (ता. श्रीरामपूर) येथील अनिल अंबादास कुलकर्णी यांनी पेटवून घेतले. आज त्यांचा मृत्यू झाला. गावगाडय़ाच्या होरपळीत हैराण झालेल्या कुटुंबाने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर अखेर सरपंचासह १७ जणांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गळिनब येथील हनुमान मंदिरासमोर कुलकर्णी यांची वडिलोपार्जित जागा आहे. ज्या जागेत अनिल कुलकर्णी राहत होते, ती जागा गावठाणाची होती. मंदिरासमोर तेथे होळी पेटविली जात असे. त्यामुळे त्या जागेवरील अतिक्रमणात असलेले घर पाडण्याचा गाव पुढाऱ्यांनी निर्णय घेतला. ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्यानंतर दोन वर्षांपासून त्याला गती आली. त्याकरिता नेत्यांकडून दबावतंत्रांचा वापर करण्यात आला.
ग्रामपंचायतने नोटीस दिल्यानंतर कुलकर्णी हे न्यायालयात गेले. आपली वडिलोपार्जित जागा आहे असे त्यांचे म्हणने होते. तर त्यांची वडिलोपार्जित जागा मागच्या बाजूला आहे असे पुढाऱ्यांचे म्हणने होते. न्यायालयाने कुठलाही आदेश केला नाही. पण राजकीय दबावातून अधिकाऱ्यांना अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी लागली. मंडलाधिकारी बी. ई. मंडलिक, पोलीस अधिकारी भालचंद्र िशदे, ग्रामविकास अधिकारी अमोल साळवे हे जेसीबी यंत्र घेऊन त्यांचे घर पाडण्यासाठी गेले. या छळाला कंटाळून अखेर त्यांनी काल रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेतले तेव्हा कुठे अधिकारी आणि पुढाऱ्यांनी मोहीम थांबवली.
जखमी कुलकर्णी यांच्यावर लोणी येथील रुग्णालयात औषधोपचार सुरू होते. आज त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच मृतदेह ठेवला. जोपर्यंत त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होत नाही. तोपर्यंत मृतदेह अंत्यसंस्काराकरिता घरी नेणार नाही असा इशारा देण्यात आला. अखेर पोलीस अधिकारी गुन्हा नोंदविण्यास राजी झाले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. मयत कुलकर्णी यांचे चिरंजीव प्रणव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरपंचासह १७ जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



