👁 9 Views

माळशिरस पंचायत समितीत मोहिते-पाटीलांची कोनशिला

अकलूज- माळशिरस पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भूमिपूजन केलेली कोनशिला बसविण्यास पंचायत समिती सदस्यांनी बहुमतांनी मान्यता दिली आहे. या निर्णयाचे मोहिते-पाटील समर्थकांनी स्वागत केले आहे.
पंचायत समितीच्या नूतन कार्यालयास खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी ग्रामविकास मंत्री असताना 7 कोटी रूपये मंजूर केले होते. या इमारतीचे बांधकाम तत्कालीन सभापती धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या कार्यकाळात सुरू झाले. 2015-16 मध्ये या कार्यालयाचे काम पूर्ण झाले. याच कालावधीत राज्यात व देशात सत्तांतर झाले. माळशिरस पंचायत समितीमध्ये मोहिते-पाटील विरोधकांची सत्ता आल्याने पंचायत समिती कार्यालयाचे उद्घाटन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचवेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भूमिपूजन केलेली कोनशिला काढण्यात आली होती. त्यावरून मोहिते-पाटील समर्थकात मोठी नाराजी पसरली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पंचायत समितीमध्ये मोहिते-पाटील गटाची म्हणजेच राष्ट्रवादीची सत्ता आली आहे.
माळशिरस पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समिती सभागृहात सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत खासदार मोहिते पाटील यांच्या नावाची कोनशिला बसविण्यासंदर्भात विषय मांडण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षनेते प्रतापराव पाटील यांनी सभागृहात हा विषय मांडला. त्यास पं.स. सदस्य नानासाहेब नाईकनवरे यांनी अनुमोदन दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 14 सदस्यांनी त्यास एकमुखी पाठींबा दिला. कोनशिला बसविण्यास 14 सदस्यांनी पाठींबा दिल्याने बहुमताच्या जोरावर सभापती मोहिते-पाटील यांनी बांधकाम खात्यास या बाबत सुचना दिली. बांधकाम विभागाने तात्काळ कार्यवाही करून कोनशिला बसवावी, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भूमिपूजन केलेली कोनशिला पुन्हा बसविण्यात आली आहे. मोहिते-पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *