औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीला दोन वर्षे बाकी असताना औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी मतदारांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेतल्याचे ते सांगत असले तरी यातून निवडणुकीत मतदारांचा कौलही लक्षात येईल, असे ते मान्य करतात.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यावधीची शक्यता वर्तवली होती. मात्र, या शक्यतेचा आणि सर्वेक्षणाचा संबंध नसल्याचे सांगत हा मतदारांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. राज्यात सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये आलबेल नसल्यामुळे विरोधकांकडून सातत्याने मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच महिनाभरापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मध्यावधीची भाषा केली. नंतर औरंगाबाद दौऱ्यात त्यांनी अशी शक्यता फेटाळून लावली. उद्धव ठाकरे यांनी मध्यावधीबाबत विधान करताच आमदार संजय शिरसाट यांनी मतदारसंघात ‘आमदार संजय शिरसाट आपल्या दारी’ हा सर्वेक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला. पक्षप्रमुखांचे विधान आणि शिरसाटांचे सर्वेक्षण हा योगायोग वाटत असला तरी हा मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न असल्याचेच दिसून येते.
ऐन निवडणुकीत नागरिकांकडे गेलो तर ते चिडतात. नाराज होतात. पाच वर्षे आला नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर मते मागण्यासाठी आलात, असा आराेप करतात. हे टाळण्यासाठीच आतापासून कामाला लागलो आहे. यातून मतदारांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न आहे. जे मतदार आजवर कधीही बोलले नाही, त्यांना या सर्वेक्षणामुळे माझ्याशी संवाद साधावा वाटेल. त्यांना शुभदिनी शुभेच्छा देता येतील. ते समस्या मांडतील. त्या मार्गी लागल्या तर निवडणुकीतही याचा फायदा होईल, असे शिरसाट म्हणाले. २०१४ च्या निवडणुकीत शिरसाट यांना भाजप पुरस्कृत उमेदवार मधुकर सावंत यांनी काट्याची टक्कर दिली होती. शिरसाट यांचा ७००० मतांनी विजय झाला होता. राज्यातील शिवसेना-भाजपमधील धुसफूस पाहता २०१९ च्या निवडणुका दोन्ही पक्ष स्वतंत्र लढतील, अशी शक्यता आहे. पश्चिम मतदारसंघ राखीव असल्यामुळे राजू शिंदे आणि जालिंदर शेंडगे भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिरसाट यांनी हे सर्वेक्षण सुरू केल्याचे बोलले जाते.
१२ जणांची टीम
सर्वेक्षणासाठी१२ जणांची टीम तयार करण्यात आली आहे. सर्वेक्षक घरोघरी जाऊन सकाळ- संध्याकाळ २० प्रश्नावली भरून घेतात. प्रश्नावलीत कुटुंबप्रमुख आणि सर्व सदस्यांची नावे, संपर्क क्रमांक, पत्ता, व्यवसाय, वाढदिवस, विवाहाची तारीख, समस्या आणि अपेक्षा आदी माहितीचा समावेश आहे. ही माहिती दररोज संगणकात अपलोड केली जाते. समस्यांप्रमाणे संबंधित विभागाला तत्काळ संपर्क केला जातो. शिरसाट यांचा कार्यकर्ता समोर उभे राहून समस्या सोडवून घेतो. नंतर आमदार शिरसाट संबंधित व्यक्तीला फोन करून समाधान झाल्याची खात्री करतात. या पद्धतीने अनेक जणांच्या लहान-मोठ्या समस्या सोडवल्याचे ते सांगतात. आतापर्यंत २५ ते ३० टक्के सर्वेक्षण झाले आहे. दोन महिन्यांत उर्वरित काम होईल, असे शिरसाट म्हणाले.
विजयाची काळजी नाही
जेनागरिककधीच माझ्याशी बोलले नाहीत, ते या सर्वेक्षणातून संपर्क साधत आहेत. समस्या सुटल्याने त्यांचे माझ्याबद्दल मत चांगले होईल. मला विजयाची काळजी नाही. -संजय शिरसाट, आमदार, पश्चिम मतदारसंघ
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




