👁 7 Views

खासदार राजू शेट्टी काढणार आत्मक्‍लेश यात्रा


उद्या पुण्यातून आरंभ : शेतकरी चळवळीचे नेतृत्त्व कमी पडल्याची कबुली

पुणे – राज्यातील शेतकऱ्यांचा 7/12 उतारा कोरा करुन कर्जमुक्ती तसेच शेतमालास दीडपट हमीभाव मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आत्मक्‍लेश यात्रा काढणार आहे. या यात्रेस सोमवारपासून (22 मे) पुण्यातील महात्मा ज्योतिबा फुले वाड्यातून सुरवात होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही पदयात्रा मुंबईत राजभवनला 30 मे रोजी पोहोचेल. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन कर्जमुक्तीबाबत गेल्या वर्षभरात गोळा करण्यात आलेल्या सुमारे साडे सहा लाख शेतकऱ्यांचे अर्ज त्यांना देण्यात येणार आहेत. राज्यभरातून दररोज किमान हजारभर शेतकरी या यात्रेत सहभागी होणार आहेत. समाजातील ज्या ज्या घटकांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांप्रती संवेदना, शेतकऱ्यांप्रती सहानुभूती व्यक्त करायची आहे, त्यांनीही शेतकऱ्यांबरोबर एक दिवस देऊन यात्रेत चालून आत्मक्‍लेष करावा, असेही आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेत स्वाभिमानीचे प्रवक्ते ऍड. योगेश पांडे, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
तुरीला मागीलवर्षी क्विंटलला 11 हजार रुपये भाव मिळाला. तो यंदा 4 हजारा रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. यामुळे देशात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तुरीला क्विंटलला 7 हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. देशात 2 लाख 93 हजार कोटी रुपयांचे तुरीच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने तोट्यातील बॅंकांचे कर्ज भरुन काढण्यासाठी गतवर्षी 30 हजार कोटी रुपयांची तरतुद केली. तर चालूवर्षी सुमारे 10 हजार कोटींची तरतूद केलेली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची वेळ आली की काही, लोकांकडून मुळ मुद्दा बाजूला पाडून भलतीच चर्चा सुरू केली जाते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या नियंत्रणात आणण्यास जसे सरकार जबाबदार आहे. तसेच समाजही जबाबदार आहे. शेतकरी ज्यावेळी आत्महत्या करतो. त्यावेळी एक प्रकारे त्याला व्यवस्था, राज्यकर्ते आणि समाज यांच्यावर अविश्‍वास दाखविलेला असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये परिस्थितीशी दोन हात करण्याची क्षमता निर्माण करण्यात किंवा लढण्याचे बळ निर्माण करण्यात शेतकरी चळवळीचे आमच्यासारखे नेतृत्वही कमी पडते आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी स्वीकारुन आत्मक्‍लेश यात्रेद्वारे शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचेही खा. शेट्टी यांनी सांगितले.

सदाभाऊ खोतांचा विषय संपला

स्वाभिमानीचे नेते आणि कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते यात्रेत सहभागी होणार नाहीत. चळवळीत अनेक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे खोत यांचा विषय माझ्यादृष्टीने आता संपलेला असल्याचेही खासदार राजू शेट्टी म्हणाले. यामुळे शेट्टी व खोत यांच्यातील दुरावा वाढला असल्याचे दिसते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *