हेग (नेदरलॅण्ड्स) : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात सुनावणी करणारं आंतरराष्ट्रीय कोर्ट काही क्षणात निकाल सुनावणार आहे. आयसीजेचा फैसला दुपारी साडेतीनच्या सुमारास येण्याची शक्यता आहे. कोर्टाचे अध्यक्ष रॉनी अब्राहम निकालाचं वाचन करतील.
‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक झालेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
निकाल भारताच्या बाजूने लागण्याचा सरकारला विश्वास
निकाल आपल्याच बाजूने लागणार, यावर भारत सरकारचा विश्वास आहे. तर दुसरीकडे कुलभूषण जाधव सुरक्षित परत यावे, यासाठी देशभरात पूजा-अर्चा, होम-हवन सुरु आहे. वाराणसीमध्ये कूलभूषण यांच्या सुरक्षिततेसाठी पूजा करण्यात आली.
कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क करण्यासाठी भारताने 16 वेळा विनंती केली होती. पण परराष्ट्र नियमांचे उल्लंघन करत पाकिस्तानने मागणी फेटाळली होती. त्यानंतर भारताने 8 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं दार ठोठावलं होतं.
नेदरलॅण्ड्समधील हेगमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी मागील आठवड्यात झाली होती. यात भारत आणि पाकिस्तानचे वकिलांनी युक्तीवाद केला होता. भारताकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी बाजू मांडली होती.
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती
सुनावणीदरम्यान भारताने पाकिस्तानवर व्हिएन्ना करारचं उल्लंघन केल्याचा आरोप करत, कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली.
भारताचा दावा फेटाळला तर…
आजचा निर्णय भारताच्या बाजूने लागला तर भारताला काऊन्सिल एक्सेस मिळेल, जेणेकरुन कुलभूषण प्रकरणात मदत मिळू शकते. तर पाकिस्तानला आशा आहे की, हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, यावर कोर्ट लक्ष देईल. पाकिस्तानचा दावा सिद्ध झाला तर भारताची बाजू फेटाळली जाईल आणि कुलभूषण जाधव यांना मदत मिळू शकत नाही. कुलभूषण जाधव यांच्या कथित कबुलीनाम्याचा व्हिडीओ कोर्टात दाखवण्यास परवानगी नाकारणं हेदेखील भारताच्या बाजूने मानलं जात आहे.
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.
जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





