👁 11 Views

सुसाट वाळू वाहतुकीमुळे निमसाखरकर भयभीत

15 ते 18 मशीनच्या सहाय्याने होतोय वाळू उपसा

निमसाखर,  (वार्ताहर) – निमसाखर (ता. इंदापूर) येथे बेफाम होत असलेल्या अवैध वाळू उपसा महसूल, पोलीस आणि सामाजिक वनीकरण विभागातील काही अधिकाऱ्यांच्या कृपादृष्टीमुळे सध्या जोरात सुरू आहे. मात्र, या भागात अवैध जड वाळू वाहतूक करणारेटिपर आणि अन्य वाहनांच्या माध्यमातून होणारी सुसाट धडकी भरणारी वाहतूक यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत.
इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील निमसाखर आणि आजूबाजूच्या भागाला नीरा नदीमुळे शेतीला मोठा फायदा झाला.असे असले तरी ही नदी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कोरडी पडल्याचे चित्र होते. नदी काठच्या शेतकऱ्यांची आपली पिके वाचवण्यासाठी दमछाक झाली, तर येथील बरेचसे क्षेत्र हे करपण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे नदीकाठचा शेतकरी अशा अडचणीत सापडला असतानाच वाळू माफियांचा धंदा मात्र जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. निमसाखर भागातील पळसमंडळ बंधाऱ्यापासून ते वीरवस्ती, हनुमान मंदिराचा मागील भाग आणि खंडोबा मंदिरापर्यंतचा भाग 15 ते 18 जेसीबी मशीनच्या साह्याने वाळू माफिया दहशतीच्या बळावर वाळूचा उपसा करीत आहेत. हे प्रकरण इथेच संपत नाही, तर सामाजिक वनीकरणातील सरकारी जागेचा वापर देखील नदीत उतरण्यासाठी केला जात आहे, त्यासाठी प्रशस्त रस्तेही करण्यात आले आहेत. वाळू उचलण्यासाठी टिपर, ट्रॅक्‍टर, ट्रा यांसह अन्य वाहनांचीही मदत घेतली जात आहे. मात्र, ही जड वाळू वाहून नेणाऱ्या या वाहनांचा वेग परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरतो आहे.
महसूल विभागाच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी एक-दोन वेळा कारवाई करण्यात आली आहे; परंतु येथील नागरिक सांगतात की, अशी एकही कारवाई झालेली नाही. जड वाहनांमुळे रस्त्याची पूर्ण वाट लागलेली आहे. या माफियांचा वचक मोडून काढण्यास पोलीसही असमर्थ ठरत आहेत. दुचाकींस्वारांवर कायम कारवाई करणारे पोलीस अशा वाहनांवर किती वेळा कारवाई करतात, असाही प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. याबाबत महसूल विभाग, पोलीस खाते आणि सामाजिक वनीकरण विभागाकडून दखल घेतली जात नाही, तर आरटीओ खातेही याबाबत गप्प का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.
बारामती-बावडा या रस्त्यावरील निमसाखरपासून केवळ 7 किलोमिटर अंतर कळंब गावात गेल्या काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात घराबाहेर पडत असताना एका युवकाचा वेगवान वाहनाच्या धडकेमुळे बळी गेल्याची चर्चा आहे. याचबरोबर टिपर अपघातात काही महिन्यांपूर्वी मोटार सायकलस्वार मृत्युमुखी पडला होता. या घटना ताज्या असतानाच आणखी किती घटना किंवा मृत्यू होण्याची येथील प्रशासन वाट पाहत आहे, असा प्रश्‍न निमसाखरवासीय करीत आहेत.
अवैध वाळू उपसा ही चोरीच आहे आणि त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांचीच आहे. ही चोरी रोखण्यासाठी महसूल खाते कटिबद्ध असून, लवकरच या प्रकाराचा दखल घेऊन कारवाई केली जाईल.
– हेमंत निकम, बारामती प्रांत अधिकारी
– पळसमंडळ बंधारा ते मारुती मंदिरापासून पुढील रस्त्याची वाट लागली आहे
– वाळू वाहून नेणाऱ्या वाहनांचा वेग नागरिकांसाठी धोकादाएक


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *