पंढरपूर दि.25 :- पंढरपूर शहरातील अतिक्रमणे हटवणार अशी माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज येथे दिली.
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत सुरु असलेल्या कामांना भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी विश्रामगृह येथे सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीस आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भरुड, सहायक पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आदी उपस्थित होते.
पंढरपूर शहरातील रस्त्यांवर दुकानदारांकडून आणि विविध प्रकारे अतिक्रमण केले गेले आहे. यामुळे पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. याचा आषाढी वारीच्या कालावधीत वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शहरातील अतिक्रमण दूर करण्याची मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण यादी तयार करावी. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी ही मोहीम राबवून अतिक्रमणे दूर करावी. गरज भासल्यास पोलीसांची मदत घ्यावी असेही, त्यांनी सांगितले.
65 एकर परिसराचा विकास करण्यात आला आहे. पण त्या कामांचा दर्जा चांगला नाही. या कामाची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 65 एकर परिसराच्या शेजारी रेल्वेचा 15 एकराचा भूखंड आहे. हा भूखंड उपलब्ध करुन घेऊन त्याचाही विकास केला जाणार आहे, असेही श्री. दळवी यांनी सांगितले. यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि रेल्वेचे अधिकारी चर्चा करतील आणि भूखंड हस्तांतर करण्याबाबतच्या प्रक्रिया पार पाडतील असेही त्यांनी सांगितले.
आषाढी वारीच्या कालावधीत सुरक्षेसाठी येणाऱ्या पोलीसांना निवास व्यवस्था व्हावी यासाठी दोन ठिकाणी संकुल उभारली जातील याबाबतही विचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने उभारलेले स्वच्छतागृह संकुलनाचे काम येत्या आषाढीपूर्वी पूर्ण करा अशा सूचना त्यांनी दिल्या.
भक्त निवासाचे काम अंतिम टप्यात आले आहे ते लवकर पूर्ण केले जाईल. त्याचबरोबर जुने भक्त निवास योग्य प्रकारे चालवले जाईल यासाठी विविध पर्यायांचा विचार सुरु आहे, असे श्री. दळवी यांनी सांगितले.
भाविकांसाठींचा स्कायवॉक सध्या 300 मीटर आहे, तो वाढवून 700 मीटर करण्याचा विचार आहे. त्याचबरोबरच मंदिरात असणारे ग्रिल काढून रांगांसाठी सुटसुटीत रेलिंग उभारण्याचा विचार असल्याचे श्री. दळवी यांनी सांगितले. रस्त्याची कामे दर्जेदार करा. त्याच बरोबरच रस्त्यांच्या दुभाजकामध्ये झाडे लावा अशा सूचना त्यांनी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना दिल्या.
बैठकीस उपविभागीय अधिकारी विजय देशमुख, संजीव जाधव, कार्यकारी अभियंता सुरेश राऊत, उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, तहसिलदार अनिल कारंडे, बाई माने आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन नंतर त्यांनी 65 एकर परिसरातील कामे, शेगांव-दुमाला रस्ता, पत्राशेड, स्कायवॉक, दर्शन मंडप पाहणी केली.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





