फेसबुक, व्हॉटस्ऍप वा अन्य कोणतेही माध्यम सोशल मीडियाचे वेड लोकांना इतके लागले आहे की, थोडा वेळही याशिवाय कुणी राहू शकत नाही. अगदी चोरसुद्धा नाही. पण चोराचं हे फेसबुकवेड त्याला तुरुंगात घेऊन गेलं. तीन वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा हा चोर फेसबुक अकाऊंटमुळे पोलिसांच्या हाती लागला.
सद्दाम उस्मान खान याच्यावर २०१४ सालामध्ये ताडदेव पोलीस ठाण्यात कारचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस सद्दाम याच्या मागावर होते. तो ताडदेवमध्ये राहत असलेला परिसर पोलिसांनी पिंजून काढला. या ठिकाणी गुप्तपणे पाळत ठेवली. सद्दामचे नातेवाईक, मित्रमंडळी सर्वांची कसून चौकशी करण्यात आली. तो कुठे याबाबत कुणीच काही सांगायला तयार नव्हते. त्यामुळे सद्दामला शोधायचे कसा असा प्रश्न ताडदेव पोलिसांना पडला होता.
सद्दामच्या मित्रांकडून पोलिसांना फोटो मिळाला. फोटो सर्व ठिकाणी पाठविण्यात आला, पण तरीही काही फायदा होत नव्हता. अखेर पोलिसांनी शक्कल लढवली आणि फेसबुक, व्हॉटस्ऍपवर सद्दामला शोधण्यास सुरुवात केली. सद्दामच्या फोटोशी मिळताजुळता चेहरा त्यांना फेसबुकवर दिसला. त्याचा प्रोफाइल आणि इतर माहिती काढून पोलिसांनी खबरी कामाला लावले. त्यावेळी सद्दाम हा नालासोपाऱ्यामध्ये लूक बदलून राहत असल्याचे समजले. पोलिसांनी नालासोपाऱयावर लक्ष केंद्रित केले. वेशभूषा आणि लाइफस्टाइल बदलण्यात माहीर असल्याने सद्दामला शोधण्यात अनेक अडचणी येत होत्या. अखेर नालासोपारामधील ओसवाल नगरी येथे तो राहत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून पकडले. सद्दाम तीन वर्षे लूक बदलून इकडून तिकडे लपत होता, मात्र फेसबुकवर तो स्वतःला लपवू शकला नाही. पोलीस फेसबुकवरून आपल्यापर्यंत पोहचतील असे सद्दामला स्वप्नातही वाटले नसेल.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





