मुंबई/
नव्याने येऊ घातलेल्या इंटरनेट आधारित ई-पोर्टलमुळे घाऊक व किरकोळ औषध खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार चव्हाट्यावर येतील, या भीतीमुळेच केमिस्ट्सनी देशव्यापी संपाची हाक दिल्याचा आरोप होत आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवार मध्यरात्रीपर्यंत देशातील साडेआठ लाख केमिस्ट ई-पोर्टलच्या विरोधात संपावर जातील, अशी घोषणा अखिल भारतीय केमिस्ट-ड्रगिस्ट संघटनेने केली, मात्र त्याला अनेक फार्मासिस्ट्सनी विरोध केला आहे.
या संपामधून रुग्णालयातील औषधविक्री दुकाने व डे-नाइट औषध दुकानांना वगळण्यात आल्याचे ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट-ड्रगिस्टचे नेते आमदार जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले. या संपात महाराष्ट्रातील ७२ हजार औषधविक्रेत्यांसह देशभरातील साडेआठ लाख औषधदुकानदार सहभागी असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र या संपात आधीच फूट पडली असून महाराष्ट्रातील २५ हजार फार्मासिस्ट-मालक दुकानदार संपात सहभागी होणार नाहीत, असे महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट्स असोसिएशनचे कैलास तांदळे यांनी सांगितले. त्यांच्याबरोबरच ग्रीन क्रॉस फाऊन्डेशन फॉर फार्मासिस्ट, ही संस्थाही बंदमध्ये सहभागी नाही, असे एफडीएने म्हटले आहे.





