👁 6 Views

हेही लक्षात घ्या !

त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली मी एक शाळकरी मुलगा होतो तेव्हा आमच्या वडिलांनी द्राक्षबाग लावली होती. त्यावेळी बागेवरील मँकोझेब म्हणजे M45 या औषधाच्या एक किलोच्या पुड्याची किंमत होती सहा रुपये, ब्लु कॉपर या औषधाच्या पुड्याची किंमत होती सहा रुपये आणि एक किलो द्राक्षाची किंमतही होती सहा रुपये. एक किलो द्राक्षे विकली की तेव्हा दोन्हीपैकी कोणताही एक पुडा विकत घेता यायचा. त्या काळात आमच्याकडे औषध मारायला एक गडी असायचा त्याची मजुरी होती अकरा रुपये. एखादया दिवशी खूप काम पडलं तर बारा रुपये. म्हणजे दोन किलो द्राक्षे विकली की एका मजुराचा पगार भागायचा. आज मँकोझेबच्या एका पुड्याची किंमत आहे जवळपास तीनशे रुपये. ब्लु कॉपरच्या पुड्याची किंमत आहे तीनशे रुपये आणि द्राक्षांचा या दर मात्र आहे चोवीस ते पंचवीस रुपये. आज औषध फवारणाऱ्या गड्याची मजुरी आहे तीनशे रुपये.थोडक्यात या तीस पस्तीस वर्षांत M45 आणि ब्लु कॉपर या औषधांची किंमत पन्नास पटीने वाढली, शेतमजुराची मजुरी पंचवीस पटीने वाढली आणि द्राक्षांचा दर मात्र चार पटीने वाढला. उत्पादन खर्च जर पंचवीस ते पन्नास पटीने वाढला असेल तर शेतमालाचा दरही त्याच पटीत नको का वाढायला?…..पण तो वाढला नाही. पूर्वी एक किलो द्राक्षे विकली की औषधाचा एक पुडा यायचा आता हाच एक पुडा विकत घेण्यासाठी बारा किलो द्राक्षे विकावी लागतात. पूर्वी दोन किलो द्राक्षे विकली की एका गड्याचा पगार भागायचा आता त्याच गड्याचा पगार भागवण्यासाठी बारा किलो द्राक्षे विकावी लागतात. त्यावेळी जे सरकारी नोकर तीनशे रुपये पगार घेत होते ते आता कमीत कमी साठ हजार रुपये घेत आहेत. म्हणजे सरकारी नोकरांचा पगार जवळजवळ दोनशे पट वाढलेला आहे. देशातल्या सगळ्याच नागरिकांचं उत्पन्न पंचवीस ते दोनशे पटीने वाढलं असेल तर शेतकऱ्याचं उत्पन्न चार पटीनंच का वाढलं? इतर सगळ्या वस्तूंच्या किंमती, सगळ्या घटकांचं उत्पन्न भौमितिक पद्धतीने वाढत असताना शेतकऱ्यानं पिकवलेल्या मालाच्या किमती मात्र स्थिर आहेत किंवा त्या बेरीज पद्धतीनं वाढत आहेत. ही गोष्ट आजपर्यंत कुणाच्याच लक्षात का आली नाही?…का येऊनही सर्वांनी तिच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं? बळीराजा बळीराजा म्हणून गोंजारत बळी तो कान पिळी या न्यायाने प्रत्येकानं शेतकऱ्याला आजपर्यंत बळीचा बकराच बनवलेलं आहे. राजकारणी लोकांनी शेतकऱ्याचा उपयोग नेहमी आपली व्होटबँक म्हणून केलेला आहे. आजपर्यंत या देशात शेतकऱ्याचा कळवळा असलेला एकच पक्ष आहे….तो म्हणजे विरोधी पक्ष. विरोधी पक्ष एकदा का शेतकऱ्याच्या खांद्यावर पाऊल ठेऊन सत्ताशिखरावर पोहोचला की लगेच त्याचं शेतकऱ्याला वाकुल्या दाखवणं आणि डोळे वटारणं सुरू होतं. हा आजवरचा इतिहास आहे. नोकरदारांचं वागणंही याहून काही वेगळं नाही. तीस वर्षांत शे दोनशे पट वेतनवाढ करून घेण्यासाठी या लोकांनी आजपर्यंत किती संप केले, किती वेळा पेपर तपासायचं टाळलं, किती वेळा उपोषणं केली आणि किती वेळा सरकारला धारेवर धरलं याला काही मोजमापच नाही. आजपर्यंत एवढे वेतनआयोग आले पण शेतकऱ्यांनी त्याला कधीच विरोध केलेला नाही…. आज शेतकरी थोडा जागृत होत आहे, स्वतःच्या हक्कासाठी एकत्र येत आहे तर लगेच सुरू झाली कोल्हेकुई ! खरंतर शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची हीच खरी वेळ आहे….पण आंदोलन करताना आंदोलनकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हे आंदोलन सरकारच्या विरोधात आहे. लोकांच्या विरोधात नाही. सरकारला अडवायचं असेल तर तुम्ही माल शेतातून बाहेर काढूच नका. तो माल आणि दूध रस्त्यावर ओतून माजोर बनू नका. कुणीतरी विद्वान मनुष्य टिल्ली होऊन तुमच्या आंदोलनानं आम्हांला काही फरक पडत नाही म्हणून खिल्ली उडवेल पण तुम्ही जर तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात तर तोही नाक घासत तुमच्यापुढे शरण येईल. दारू पिऊन आणि हवेत तरंगून कुणी जगू शकत नाही…..पुकारा असहकार !…करा आंदोलन…..पण शांततेनं. चाळीसचं दूध बेचाळीसला झाल्यावर गळा काढणारे लोक जेव्हा वीस रुपये लिटर दरानं पाणी, आणि पन्नास रुपये दरानं कोल्ड्रिंक पितात तेव्हा तुमच्या मनाला पडणारा पीळ सर्वांना दिसू दे. ….दुधाचा दर दोन रुपये वाढला तर पेंढेचं पोतं दोनशे रुपयांनी वाढलेलं असतं हे तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाला कळणार? उत्पादन खर्च पंचवीस पन्नास पटीत वाढला आणि तुमच्या मालाचा दर आहे तोच राहिला तर काय करणार शेती आणि कसा चालवणार संसार?….असा आतबट्ट्यातला धंदा करण्यापेक्षा सोडा तो धंदा……असंही काही मिळत नाही तर पदरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्याच कशाला? ……एकत्र आलात आणि एकत्र लढलात तरच काही पदरात पडेल नाहीतर बळीराजाचा भिकारी कधी होईल कळणारही नाही तुम्हांला !
(मी सांगितलेली आकडेवारी खरी आहे…..केवळ विरोधासाठी विरोध करू नये !)
©डॉ.अशोक माळी,
साईनंदन पार्क,
 मिरज.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *