👁 8 Views

‘ती’चे दुर्लक्षित आरोग्य

– स्तन कर्करोगाचे वाढते प्रमाण
– १५ पैकी १ महिला ग्रस्त
– ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमांतर्गत जनजागृती
 
नागपूर, ३ जून
कुटुंबातील सदस्यांसाठी सतत झटणार्‍या भारतीय महिला स्वत:कडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका नेहमी केली जाते. विविध सामाजिक रूढी-परंपरा, नात्यांचा बोझा, संकोच आणि समाजाच्या टीकेची भीती आदी विविध कारणांमुळे सामान्यपणे स्वत:ला होणारे शारीरिक त्रास महिला सांगत नाही. योग्यवेळी उपचार न मिळाल्यास त्याचे भयंकर परिणामही त्यांना भोगावे लागतात. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमांतर्गत आणि पं. दीनदयाल उपाध्याय वैद्यकीय विज्ञान संस्था, संशोधन आणि मनुष्यबळ विकास संस्थेच्या सहकार्याने स्तन कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
२ जानेवारी २०१७ रोजी या उपक्रमाला सुरुवात झाली. आतापर्यंत ७ हजारांवर महिलांच्या स्तन कर्करोगाची चाचणी झाली असून, त्यापैकी साधारणत: १३७ महिलांमध्ये कर्करोगाच्या गाठी आढळून आल्या. त्यातील ४ जणी अविवाहित युवती तर उर्वरित ३५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील असल्याची माहिती उपक्रमाच्या नागपूर शहर संयोजिका मनीषा काशीकर यांनी दिली. वैचारिक चळवळ चालविणार्‍या दै. तरुण भारतच्या रामदासपेठ कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्या बोलत होत्या.
स्तन कर्करोग महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येणारा आजार ठरला असून, १५ महिलांपैकी एकीला हा रोग असल्याचे निदान झाले आहे. या शिबिरात ‘आयब्रेस्ट’ नावाच्या अत्याधुनिक उपकरणाच्या साहाय्याने महिलांची तपासणी केली जाते. संस्थेच्या माध्यमातून ४ उपकरणांच्या मदतीने ही शिबिरे राबविण्यात येत असून, एका उपकरणाच्या माध्यमातून दिवसाकाठी २०० महिलांची तपासणी करता येते. शहरातील विविध भागांमध्ये विशेषत: झोपडपट्ट्यांमध्ये हे शिबिर घेऊन महिलांची तपासणी केल्याचे काशीकर यांनी सांगितले. शिवाय महानगरपालिकेच्या सफाई कामगार आणि मनोरुग्णालयातील महिला रुगणांचीही तपासणी करण्यात आली. मनोरुग्णालयात एकूण ४०० महिलांपैकी ११ प्रकरणे कर्करोगाबाबत सकारात्मक असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अभिनेता कमल हसनची पत्नी गौतमी स्तन कर्करोगातून सुरक्षित बचावली असून, तीच या उपक्रमाची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर आहे.
नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एकसष्ठीनिमित्त अशा प्रकारच्या ६१ शिबिरांचे आयोजन करून पाच हजार महिलांची तपासणी करण्यात आल्याचे मनीषा काशीकर यांनी सांगितले. केवळ तपासणी करून न थांबता कर्करोगाचे निदान झाल्यास संबंधित महिलेस पुढील उपचार आणि मोफत शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत असल्याने महिलांनी न संकोचता ही चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘कोणताही देश तोपर्यंत यशस्वी होणार नाही, जोपर्यंत त्या देशातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार नाही’ या वचनानुसार यशस्वी भारत बघायचा असेल तर महिलांच्या आरोग्याकडे आणि विशेषत: वेगाने वाढणार्‍या स्तन कर्करोगासारख्या आजारावर वेळीच नियंत्रण घालणे आवश्यक आहे.
बचावासाठी हे टाळा
१) डिओड्रण्ट थेट त्वचेवर फवारणे
२) काळी आणि जाड अंतर्वस्त्रे घालणे
३) जंक फूड, जड पदार्थ वारंवार खाणे
काय आहे ‘आयब्रेस्ट मशिन?’
स्तनामध्ये कर्करोगाच्या गाठी किंवा त्याची सुरुवात आहे का? हे बघण्यासाठी या मशिनचा उपयोग केला जातो. साधारण दीड लाख रुपये किमतीचे हे मशिन वजनास हलके आणि वापरायला अतिशय सुलभ आहेत. तपासणीच्या निकालासाठी वाट बघावी लागत नाही. एका तपासणीला साधारण ५ ते ७ मिनिटे लागतात आणि लगेच निकाल सांगितला जातो. संगणकाच्या माऊसएवढी लहान आणि मोबाईलच्या स्क्रीनएवढी ही मशिन सूक्ष्मातील सूक्ष्म जंतूसंसर्ग शोधून काढते. पहिल्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाल्यास लगेच उपचार करून त्यावर सहज नियंत्रण मिळविता येते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 

अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *