नागपूर, ७ जून
स्वामी समर्थ रामदास यांनी केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्णनाचा अनुभव महाल परिसरात आज बुधवारी अनुभवास आला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यात आनंदवन भुवनी याची प्रचीती नागरिकांना आली.
श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा ढोल-ताशांच्या गजरात थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मराठमोळ्या वेशभूषेत १५१ सुवासिनींनी छत्रपतींची आरती केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला.
हिंदू धर्माची विजयी पताका सातासमुद्र पार नेणार्या शिवछत्रपतींचा आज ७ जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन आहे. महालातील गांधी गेट समोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हा सोहळा पार पडला. याप्रसंगी महापौर नंदा जिचकार, सद्गुरुदास महाराज, राजे मुधोजी भोसले, राजे जयसिंग भोसले, प्रा. सुमंत टेकाडे यांच्या हस्ते वेदमंत्रोच्चारात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. महाल परिसरात या सोहळ्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी होती. परिसरातील नागरिकांनी आपापल्या घरासमोर आणि चौका-चौकांमध्ये भल्या पहाटेच सुंदर रांगोळ्या रेखाटल्या होत्या.
सकाळी ७ वाजता या सोहळ्याला प्रारंभ झाला. शिवाज्ञा, शिवगर्जना, शिवछत्र आणि शिवसाम्राज्य या ढोल-ताशा पथकांनी शिस्तबद्ध पद्धतीने ढोल-ताशांचे वादन करून वातावरण भारावून टाकले होते. यावेळी भगवे पताके भालदार, चोपदारांसह पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली. ताज राज हिरा आखाड्याच्या विद्यार्थ्यांनी लाठ्या-काठ्या, तलवारबाजी आणि रणांगणावरील प्रात्यक्षिके प्रस्तुत केली. मराठमोळ्या वेशभूषेतील सुवासिनींनी महाराजांची केलेली आरती सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. हा सोहळा बघण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
Posted inMaharashtra
ढोल-ताशांच्या गजरात शिवराज्याभिषेक सोहळा
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





