कलाकारांसोबत राजकारण खेळू नका
गायक- संगीतकार अवधूत गुप्तेची बदनामी करण्यासाठी व्हायरल करण्यात आलेला ट्विटर स्क्रीनशॉटचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संपाचा मुद्दा बराच चर्चेत आला असताना या मुद्द्याचं गांभीर्य लक्षात घेत राजकीय नेत्यांसोबतच इतरही काही व्यक्तींनी याविषयी त्यांचं मत मांडण्यास सुरुवात केली. पण, त्यामध्ये एका ट्विटने अनेकांच्याच भुवया उंचावल्या. गायक- संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या नावाचा वापर करून हे ट्विट करण्यात आलं होतं. पण, इथे महत्त्वाची बाब अशी की हे ट्विटर अकाऊंट फेक होतं. मुळात ते ट्विटर अकाऊंट नव्हतच असं अवधूतने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना स्पष्ट केलं.
व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या स्क्रीनशॉटमध्ये मॉर्फिंगचा वापर करत कुणीतरी हे कृत्य केल्याचं आता उघड झालं आहे, असं अवधूत म्हणाला. सुरुवातीला या साऱ्याचा मला काहीच त्रास झाला नाही. पण, त्यानंतर जेव्हा मी फेसबुकवर स्पष्टीकरण देत हा सर्व प्रकार उघड करत एक पोस्ट लिहिली तेव्हा त्याखाली नेटिझन्सची बऱ्याच कमेंट्स केल्या. तेव्हा या गोष्टीचं गांभार्य लक्षात आलं. कारण त्या एका व्हायरल स्क्रीनशॉटमुळे मी माझं विधान बदलतो आहे, असा अनेकांचा समज झाला होता, असं अवधूत म्हणाला.
या सर्व प्रकरणी त्याने सायबर क्राईम विभागामध्ये रितसर तक्रारही नोंदवली. पण, मुळात माझ्यासोबत हा जो काही प्रकार झाला तो कोणासोबतही होऊ शकतो, असं म्हणत त्याने इतरांनाही सतर्कतेचा इशारा दिला. व्हॉट्सअॅपवरुन आपल्यापर्यंत पोहोचणारी प्रत्येक गोष्ट खरीच असेल याची काहीच खात्री नसते, त्यामुळे त्यावर लगेचच विश्वास ठेवू नका हा महत्त्वाचा संदेशही त्याने दिला. त्यासोबतच अवधूतने त्याच्याविरोधात असा चुकीचा स्क्रीनशॉट व्हायरल करणाऱ्यांची कटू शब्दांत निंदा केली आहे. कलाकारांसोबत अशा प्रकारचे वाईट राजकारण खेळ नका, असा इशाराही त्याने दिला.






