👁 9 Views

राज ठाकरेंनी बाळा नांदगावकर समर्थंकाची केली उचलबांगडी, म्हणाले- यापुढे कुणाचाच गट नसेल

मुंबई-मुंबईतील मनसेच्या संघटनात्मक फेरबदलाच्या बैठकांचे नियोजित वेळापत्रक पूर्ण होण्यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातल्या बड्या नेत्यांना झटके देण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी त्यांनी भायखळा आणि शिवडी या विभागांच्या विभागाध्यक्षपदावरून पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्या समर्थकांची उचलबांगडी करत नव्या विभागाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. विशेष म्हणजे भायखळा विभागात तर नांदगावकरांचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या संजय नाईक यांचीच वर्णी लावत राज यांनी नांदगावकर गटाला जोरदार झटका दिल्याचे बोलले जात आहे.


गेल्या दोन तीन वर्षांतील सलगच्या पराभवानंतर मनसेत सध्या संघटनात्मक पातळीवर फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून गेल्या तीन आठवड्यांपासून राज ठाकरे यांनी मुंबईतील विभागनिहाय बैठकांना सुरुवात केली आहे. दरम्यान, शिवडी आणि भायखळा विभागातील बैठकांमध्ये तर कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंसमोर स्थानिक स्तरावरील गटातटांचे गाऱ्हाणे मांडले होते. याची गंभीर दखल घेत ‘यापुढे कुणाचाच गट नसेल’ अशा शब्दांत राज यांनी बदलाचे संकेत दिले होते. विशेष म्हणजे या बैठकांपासून आपल्याला दूर ठेवल्यामुळे पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.


मनसेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवडीतील बैठकीत कार्यकर्त्यांच्या ‘तक्रार नाट्या’चे पर्यवसान मनसेच्या दोन गटांतल्या तुफान हाणामारीत झाले. ही बाब जरी पक्षांतर्गत पातळीवरच दाबण्यात आली असली तरीही राज ठाकरेंनी या घटनेची गंभीर दखल घेत या विभागांमध्ये तातडीने फेरनियुक्त्या केल्या आहेत. बाळा नांदगावकर यांचे अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या विजय लिपारे यांना भायखळा विभागाध्यक्षपदावरून हटवत त्यांच्या जागी संजय नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर शिवडी विभागाध्यक्षपदावरून आणखी एक नांदगावकर समर्थक सचिन देसाई यांची उचलबांगडी करत नंदकुमार चिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंधेरी विभागात मनसेचे उपाध्यक्ष संदीप दळवी यांच्या समर्थकाला हटवून रोहन सावंत या सर्वसामान्य कार्यकर्त्याची विभागाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप दळवी हे भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे मेहुणे असून ते मनसेतील एक बडे नेते समजले जातात.
 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *