👁 4 Views

चंडीगडचा अवैध मद्यसाठा नाशिकमध्ये जप्त

 

नाशिक : चंडीगडमधून नाशिकमध्ये आणलेला अवैध मद्य साठा शहरातील गंगापूर रोड परिसरातील उच्चभ्रू इमारतीच्या पार्किंगमधून जप्त करण्यात आला. शहर गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे.


ओमनी वाहनासह मद्यसाठा असा सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, यामागे मद्य तस्करांची मोठी साखळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे


पद्‌मसिंग कैलास बजाड (३२, रा. सिंहस्थनगर, सिडको. मूळ रा. जऊळके, झोडगे, ता. मालेगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक हेमंत नागरे यांना गंगापूर रोड परिसरातील सिरीन मिडोजमधील प्रियांका ब्लॉसम या इमारतीच्या पार्किंगमध्ये अवैध मद्यसाठा आला असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पथकाने रविवारी (ता. १९) रात्री पावणेबाराच्या सुमारास शिताफीने सापळा रचून छापा टाकला. सिरीन मिडोजमध्ये संशयित बजाड हा त्याच्या मालकीच्या ओमनी चारचाकी वाहनात (एमएच- १५- बीएक्स- ००८१) अवैधरीत्या मद्यसाठा ठेवत होता.


त्याचवेळी दबा धरून असलेल्या पथकाने छापा टाकून त्यात अटक केली व ३ लाख १७ हजार १०५ रुपयांचा विविध कंपन्याचा मद्य साठा जप्त केला. सदर मद्यसाठा चंडीगड येथील असून, तो नाशिकमध्ये आणला होता.

मद्यसाठा नाशिकमध्ये कसा आला, यामागील मद्य तस्करांची मोठी साखळी असून तिचा शोध घेण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, अंमलदार रवींद्र दिघे, भारत डंबाळे, नितीन भालेराव, अनिरुद्ध येवले, बाळासाहेब नांद्रे, भाऊसाहेब कुटे, अविनाश फुलपगारे, योगेश सानप आणि चंद्रकांत बागडे यांनी केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *