👁 12 Views

सोलापूर- सामूहिक बलात्कारातील सर्व आरोपींना तातडीने अटक करा- डॉ. नीलम गोऱ्हे

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-


सोलापुरात एका दलित अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, सर्व आरोपींना अटक करण्यात यावी आणि पीडित मुलीला तत्काळ मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली आहे.

सोलापुरात विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्य़ानुसार गेल्या सहा महिन्यांपासून पीडित दलित अल्पवयीन मुलीवर सर्व आरोपी सामूहिक लैंगिक अत्याचार करीत होते. राज्यात हिंगणघाट येथील पीडितेचे प्रकरण ताजे असतानाच सोलापुरात ही घटना समोर आली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस खात्याने सर्व आरोपींना अटक करावी आणि तातडीने तपास करून नराधमांना कठोर शिक्षा होण्याच्यादृष्टीने कर्तव्य पार पाडावे. अटक केल्यानंतर आरोपींना जामीन मिळणार नाही, याची दक्षता पोलीस अधिकाऱ्यांना घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

 तसेच पीडित मुलीला शासनाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत मिळण्यासाठी पंधरा दिवसात कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पीडित मुलीला साक्षीदार संरक्षण कायद्यानुसार संरक्षण द्यावे, अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *