👁 11 Views

कोरोनाच्या सावटाखाली प्रशासकीय अधिकार्‍यांनी जपली ‘माणुसकी’

Pandharpur Live-  
कोरोना विषाणुने संपुर्ण जगात थैमान घातलेले आहे. आपल्या देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या संचारबंदी चा काळ आहे. परंतु या काळात हाताला काम नसल्याने मोठमोठ्या शहरातील कामगारांनी अक्षरश: मिळेल त्या मार्गाने आपल्या बायका-लेकरांना घेवुन आपले गाव जवळ करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काल पंढरपूर तालुक्यातील वाखरी इथे अशीच कांही कुटुंब चक्क पुणे-ते वाखरी अशी पायपीट करत वाखरी येथे आल्याचे आढळुन आले. याची माहिती समजताच पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी तात्काळ याठिकाणी धाव घेतली सर्वांची विचारपुस करत त्यांना चहा, बिस्कीट व लहान मुलांना दुध दिले. यानंतर वाखरी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. 

यावेळी पंढरपूर च्या तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांना ही माहिती मिळताच त्यांनीही याठिकाणी धाव घेतली, सर्वांची विचारपुस करत सर्वांना दिलासा दिला. प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सुरक्षितरित्या 65 एकर येतील इन्स्टिट्यूट कोरानटाईन सेंटर मध्ये नेण्यात आले. या सर्व घटनाक्रमात प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे व पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी पुण्यावरुन कर्नाटकातील आपल्या घराकडे पायी निघालेल्या, भयभीत झालेल्या या 47 जणांना आधी भयमुक्त केले, दिलासा दिला, खाण्यापिण्याची व्यवस्था केली. याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सर्व अधिकार्‍यांनी आपल्या कृतीद्वारे माणुसकीचे खरे दर्शन घडविल्याची भावना अनेकजण व्यक्त करत आहेत.  

याबाबत पोलीसांकडून समजलेल्या अधिक माहितीनुसार काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाखरी चौक नाकाबंदी येथे कर्तव्यावर असलेले ए. एस. आय. क्षीरसागर यांनी पोलीस निरीक्षक श्री भस्मे यांना हॉटेल परिवार जवळ वाखरी येथे काही मजूर मुले बायका पुरुष रोडच्या कडेला थांबून असल्याबाबत कळल्याने पोलीस निरीक्षक भस्मे यांनी तत्काळ पोलिस स्टाफसह सदर ठिकाणी भेट देऊन तेथील इसमांना तुम्ही कुठून आला याबाबत विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की आम्ही पुणे येथून आतापर्यंत चालत आलो आहे. आम्हाला आमच्या मूळगावी रायचूर जिल्हा राज्य कर्नाटक मध्ये जायचे आहे आम्ही पुण्यामध्ये मजूर काम करत होतो आम्हाला आता तिथे काम उरले नाही ठेकेदार निघून जा असे म्हणाले मुळे आम्ही चालत निघालो आहे असे सांगितले.

परंतु सध्या संपूर्ण देशामध्ये संचारबंदी लागू असल्यामुळे सदर व्यक्तींना असेच सार्वजनिक ठिकाणी सोडणे योग्य नसल्याने याबाबत तात्काळ मा. प्रांताधिकारी पंढरपूर तसेच मा.तहसीलदार मॅडम पंढरपूर यांना कळवले. त्यानंतर या लोकांना तुम्ही जेवलात का याबाबत विचारणा केली असता त्यांनी आम्ही सकाळपासून उपाशी आहोत असे सांगितल्याने त्यांना पोलिसांच्या वतीने बिस्कीट लहान मुलांना दूध देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. त्यानंतर पोलीस पाटील वाखरी व ग्रामस्थ यांच्या मदतीने गावातून जेवण एकत्रित करून या लोकांना जेवण घालून या मिळालेल्या मजुरांच्या बाबतीत माननीय प्रांताधिकारी व मा.तहसीलदार मॅडम यांच्याशी चर्चा करून शासन स्तरावर देण्यात आलेल्या सूचनांचा अनुषंगाने एकूण 47 इसमांना तीन वाहनातून सुरक्षितपणे मजूर पुरुष स्त्रियांना व लहान मुले यांना पंढरपूर नगर परिषद यांचे वतीने तयार करण्यात आलेल्या 65 एकर येतील इन्स्टिट्यूट कोरानटाईन सेंटर मध्ये जमा करण्यात आले असून त्यावेळी माननीय तहसीलदार मॅडम स्वतः उपस्थित होत्या.

याठिकाणी पंढरपूर तालुका पोलीस यांच्यावतीने पोलीस गार्ड लावणेबाबत तजवीज केलेली आहे. तसेच नमूद मजुरांच्या पुढील जेवणखान बाबत माननीय प्रांताधिकारी यांना व प्रशासनाला कळविले असून सर्वांची आरोग्य सेवक यांचेकडून वैद्यकीय तपासणी केली आहे. अशी माहिती  पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे श्री.वाडदेकर यांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *