पंढरपूर – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर AICTE, DTE आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्याकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वेरीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे. या ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब स्वेरीतील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पदवी व पदविका, कॉलेज ऑफ फार्मसी पदवी व पदविका तसेच एमबीए विभागाकडून करण्यात येत आहे.
सध्या कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून या विषाणू पासून बचावासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात असतानाच स्वेरीकडून देखील ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम आमलात आणले जात आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विषयांनुसार व प्रकरणानुसार व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स, कॉन्फरन्सिंग द्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद, त्यांच्या शंकांचे निरसन या बाबींचा समावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे व्हॉटसअप ग्रुप बनवून त्यांना स्टडी मटेरियल पाठवले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ चॅनल तयार करून यु-ट्यूब द्वारे मार्गदर्शन करण्याचे कार्य देखील सर्व शिक्षक घर बसल्या करत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास पूरक असणाऱ्या फ्री शैक्षणिक कोर्सेस बद्दल देखील प्रोत्साहित करण्यात येत आहे. स्वेरीतील विद्यार्थ्यांचे दि. १५ मार्च पासून वर्ग बंद करण्यात आले.
त्यामुळे पुढे दि.१७ मार्च पासून या शैक्षणिक प्रक्रियेला सुरवात करण्यात आली. लॉकडाऊनमुळे विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी असली तरी देखील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी स्वेरी सतत प्रयत्नशील आहे. तसेच प्राध्यापक वेगवेगळ्या ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स मध्ये सहभागी होत आहेत. स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे व स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. पी.एम.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक या ऑनलाईन प्रक्रियेत कार्यरत आहेत. विद्यार्थी व पालकांकडून देखील या ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

