👁 11 Views

हॉस्पिटलच्या बेजबाबदारपणामुळे माझ्या प्रभागातील नागरिकांना कोरोना संसर्गाचा धोका! – नगरसेवक विक्रम शिरसट ; पंढरीतील अॅपेक्स हॉस्पिटलवर कारवाईची मागणी



पंढरपूर :(प्रतिनिधी)- पंढरपूर येथील अॅपेक्स हॉस्पिटलबाबत तक्रारी वाढल्या असतानाच आणखी एक नवीनच प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटल मधील एका कर्मचारी महिलेचा कोरोना रिपोर्ट आधी निगेटीव्ह असल्याचे सांगितले व सदर महिला कर्मचारी आपल्या घरी आल्यानंतर रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे कळवले. सदर महिला माझ्या प्रभागात वास्तव्यास आहे. हॉस्पिटल च्या बेजबाबदार पणामुळे माझ्या प्रभागातील नागरिकांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या या बेजबाबदार हॉस्पिटलवर कारवाई करावी अशी मागणी पंढरपूर नगरपरिषदेचे बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट यांनी एका लेखी निवेदनाद्वारे  केली आहे. नुकतेच त्यांनी या मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयात सुपूर्त केले.


       मागील काही दिवसात एक कोरोना रुग्ण या हॉस्पिटलमध्ये आढळून आला होता. त्या पार्श्वभूमीवर त्याठिकाणी असलेले सर्व कर्मचारी यांची तपासणी केली होती. त्यामध्ये सर्व कर्मचारी निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याठिकाणी काम करीत असलेले कर्मचारी बिंधास्त फिरू लागले. परंतु त्याठिकाणी असलेली एक महिला कर्मचारी विक्रम शिरसट यांच्या प्रभागातील होती. त्यांनी निगेटिव्ह असल्याचे सांगितले नंतर सदर महिला कर्मचारी आपल्या घरी आली, आणि यानंतर तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे कळविण्यात आले.  त्यामुळे त्या दिशाभूल केलेल्या रिपोर्ट मुळे माझ्या प्रभागातील नागरिकांना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्याला ते हॉस्पीटल जबाबदार राहणार आहे. यासाठी सदरची कारवाई बाबतची तक्रार आपण करत असल्याची माहिती नगरसेवक विक्रम शिरसट यांनी दिली आहे. 


  सदर निवेदनाची प्रत आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री, पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मेडिकल कौन्सिल, राज्य महिला आयोग आदींसह विविध विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत. असेही शिरसट यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *