माढा तालुक्यातील शिराळ टेंभुर्णी येथील संजय मारुती काळे (वय ४५) या व्यक्तीची शेवरे (ता.माढा) येथे निर्घृणपणे हत्या करण्यात आली. अज्ञात आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने खून करून मृतदेह जाळून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शेवरे येथे कॅनॉलजवळ रविवार (ता.२६) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
अकलूज-टेंभुर्णी रस्त्याच्या पूर्वेस उजनी कॅनॉलच्या भराव्याखाली छातीच्या खालचा भाग जळालेल्या अवस्थेतील अनोळखी इसमाचा मृतदेह दिसून आला. या ठिकाणी (एमएच-४५-६५७७) या क्रमांकाचा टेम्पोही पलटी केलेला होता. दरम्यान, मारेकऱ्यांनी त्यास ठार करून टेम्पोची स्टेफनी अंगावर टाकत मृतदेह पेटवून दिला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेत तो टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. तेथे शिराळ ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. खुन कोणत्या कारणावरुन झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.


