या लेखाला सुरुवात करण्यापूर्वी माझे गुरुवर्य श्री. स्वामी सागरानंद सरस्वती महाराज तसेच वेदशास्त्रसंपन्न श्री. बाळकृष्ण भानुदास देव गुरुजी यांना नमन करून सुरुवात करतो. आपल्या भारत वर्षामध्ये श्रावण महिन्याला व त्यातील प्रत्येक दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे. तसेच हा महिना अत्यंत पवित्र व मनाला समाधान देणारा आहे. अध्यात्मा बरोबर विज्ञानाचे अधिष्ठान आहे. भारत हा देश पूर्वीपासून कृषिप्रधान आहे. तसेच पूर्वीच्या काळी शिक्षणाचा अभाव असल्याकारणाने, आपल्या ऋषिमुनींनी अध्यात्मातून विज्ञानाची एक जोड दिलेली आहे. ती म्हणजे श्रावणात येणारे सातही वारांशी निगडीत व्रत.
प्रथम सूर्याशी निगडीत श्रावणातल्या रविवारी या व्रताला आदित्य पूजन असे म्हणतात. सूर्यपूजन हे सूर्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. सूर्यापासून आपल्याला अन्न प्रकाश तसेच सूर्याच्या कोवळ्या किरणांत ‘ड’ जीवनसत्व असते. त्यामुळे जंतूंचा नाश होतो. रक्तातील हिमोग्लोबीन वाढते. तसेच मुलांची प्रकृती सुधारते. आणि लहान मुलांना सकाळच्या कोवळ्या उन्हात काहीवेळ घेऊन बसले असता, रक्ताभिसरण नीट होऊन बाळ निरोगी होते. त्यानंतर सोमवारला श्रावण महिन्यात खूपच महत्त्व आहे. या दिवशी विशेष करून वैराग्याची देवता भगवान शिव हे श्रावण महिन्यातील प्रमुख दैवत. या दिवशी लोक एकभुक्त राहून उपवास करतात. त्याने पोटाला आराम मिळतो. बरेचसे आजार अन्न पचन न झाल्यामुळे होतात. भगवान शिव हे दैवत तसेच या देवाला फक्त जल बिल्वपत्र अर्पण केले तरीही संतुष्ट होतात.
त्यानंतर मंगळवार या दिवशी नवीन विवाह झालेल्या कन्यांसाठी मंगळागौरी हे व्रत आवर्जून केले जाते. या काळात वेगवेगळे गोड-धोड नैवेद्य बनवून भगवान शिव आणि गौरी यांची पूजा करून, पतीच्या आयुष्याची वृद्धी व्हावी अशी अपेक्षा ठेवतात. तसेच ज्या सुवासिनीचे पाच वर्ष पूर्ण होतात, त्यावेळेस या व्रताची ची सांगता होते. या व्रतात स्त्रिया वेगवेगळे खेळ खेळतात त्यामुळे शरीराचा व्यायाम होतो.
त्यानंतर बुधवारी बुध्दीचे म्हणजे बुध ग्रहाचे पूजन होते.
पुढे गुरुवारी बृहस्पति पूजन, गुरुपूजन अत्यंत आनंदाने साजरे केले जाते.
शुक्रवारी जिवतीचे व्रत. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी सुवासिनी स्त्रिया हे व्रत करतात. आपत्य जन्मानंतर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी षष्ठी पूजन केले जाते. या पूजनाला जन्मदा पूजन असेही म्हणतात. लहान मुलांच्या आरोग्यासाठी तसेच कुटुंब व्यवस्था चिरकाल टिकण्या करता, पुत्र प्राप्ति देणाऱ्या जिवंतिका देवीचे पूजन शुक्रवारी करतात. या दिवशी मुलांना औक्षण करून चांगले गोड-धोड जेवण देतात. त्यावेळेस देवीची प्रार्थना करतात.
पुढे शनिवारी अश्वत्थ पूजन मारुती पूजन म्हणजे वृक्ष देवता व शक्तीची देवता यांचे पूजन होते. तसेच श्रावण महिन्यात येणारे प्रमुख सण म्हणजे नागपंचमी, राखी पौर्णिमा, बैलपोळा. भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वीपासून गाय, बैल, सर्प, मुंगूस, हत्ती इ. यांसारखे प्राणी तसेच वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, दूर्वा, आघाडा, तुळस, बेल, माका, चाफा, रुई यांसारखे अनेक वृक्ष किंवा या वृक्षांची किंवा प्राण्यांची हानी होऊ नये, संपुष्टात येऊ नये म्हणून आपल्या ऋषिमुनींनी यांना देवतेचे स्वरूप दिले. आपण ज्याला देव मानतो त्या गोष्टीची किंवा त्या तत्त्वाची हानी कमी प्रमाणात होते म्हणून श्रावण महिन्यात पाऊस असल्या कारणाने बिळामध्ये पाणी जाऊन सर्प, नाग बाहेर येण्याचे प्रमाण जास्त असते. बरेचसे सर्प हे बिनविषारी असतात. ते मारले जाऊ नये, किंवा त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून नागदेवतेच पूजन केलं जातं. या दिवशी नाग नरसोबा या रंगीत कागदाचे किंवा प्रत्यक्ष नागाचे पूजन केले जाते. अनेक स्त्रीया वारुळाला पुजतात, या दिवशी गारुडी लोकांना दान दक्षिणा तसेच नागाची पूजा करून स्त्रिया त्याला हळदी-कुंकू वाहून दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी पूर्वीपासून नागपंचमीला चुलीवर अन्न शिजवत नाही अशी प्रथा आहे. या दिवशी कुठलीही भाजी, लिंबू, मिरची कापू नये, कुठलेही पदार्थ तळू नये, जमीन खणु नये, केस विंचरू नये अशी श्रद्धा आहे.
या पौर्णिमेला राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा असेही म्हणतात. राखी पौर्णिमेला देवाची पूजा करून देवाला राखी बांधून देवाकडून रक्षणाची अपेक्षा करणे अशी श्रद्धा आहे. नंतर बहीण भावाला उजव्या हातात औक्षण करून राखी बांधते. भावाने बहिणीचे संरक्षण करावे हा त्यामागचा हेतू. नारळी पौर्णिमा हा सण कोळीबांधव अतिशय उत्साहाने साजरा करतात. कारण कोळीबांधव हे आपल्या उपजीविकेसाठी समुद्रकिनारी राहतात. त्यांचा रोजचा व्यवसाय समुद्रात दूरवर जाऊन मासे पकडणे आणि त्या माध्यमातून स्वतःची उपजीविका करणे. हा व्यवसाय वर्षातील काही महिने तेजीत असतो. पण पावसाळ्यामध्ये एक सारखा पाऊस पडल्याने समुद्राच्या पाण्यात पाण्याची भर पडते. त्यामुळे समुद्र खवळलेला असतो. अशावेळी कोळी लोकांना मच्छीमारीचा व्यवसाय करणे अशक्य होते. त्यामुळे आषाढ, श्रावण काळात कोळी बांधव समुद्रात जात नाही. परंतु श्रावणात येणार्या पौर्णिमेला पावसाचा जोर कमी होतो, आणि समुद्र शांत होतो. त्यामुळे कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून तसेच कोळी महिला समुद्राला आपला भाऊ म्हणून पाण्यात राखी सोडतात. आणि समुद्र पूजन करून नवीन वस्त्र धारण करून समुद्राला गोडाधोडाचा नैवेद्य करून हा सण उत्साहाने साजरा करतात. सागराने आपल्या पतीचे रक्षण करावे हाही हेतू यात आहे.
बैलपोळा, पिठोरी अमावस्या, मातृदिन हे तीन सण श्रावणाच्या उत्तरार्धात येतात. भारत हा देश कृषिप्रधान असल्या कारणाने खेड्यांमध्ये या सणाचे आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे. बैल हा शेतकऱ्याचा मित्र असल्या कारणाने वर्षभर शेतात शेतकऱ्याच्या बरोबरीने काम करतो. अशा गुणवान मित्राची कदर व्हावी, त्याच्या उपकाराची, कष्टाची जाणीव व्हावी म्हणून वर्षातून एकदा बैलांना नदीवर स्नान घालून, रंगीबेरंगी वस्त्रांनी सजवून पाठीवर झूल कापड टाकून, शिंगांना चमकणारे बेगड लावून, गळ्यात घुंगराच्या माळा, अंगावर विविध रंगानी सुंदर असे नक्षीकाम करतात. गावातून वाजत गाजत मिरवणूक काढतात. मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी नेतात. त्यानंतर घरी आल्यावर त्याला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात. काही ठिकाणी सायंकाळी बैलांची मिरवणूक काढतात. या दिवशी बैलांकडून काहीही काम करून घेत नाही. तसेच आज-काल बाजारात मातीच्या प्रतीकात्मक बैलाचे पूजन करतात. श्रावणामुळे सर्व दळण व्यवस्था चांगल्याप्रकारे स्वरूप धारण करते. हिंदू धर्मामध्ये हे सर्व व्रत मनाला आनंद देणारे, उल्हास देणारे व स्त्रियांचा वर्षभराचा शिण घालवणारे असतात. आपल्या भारतीय ऋषिमुनींनी अध्यात्मातून या सर्व प्राणिमात्रांचे, निसर्गाचे संवर्धन व्हावे, म्हणून अध्यात्मातून विज्ञानाचा संदेश दिलेला आहे.
– वे.शा.सं. श्री. डॉ. पंकज पद्माकर घेवारे (शास्त्रीजी)
त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालय
पाचोरे गल्ली, गावठा, सिन्नर
मोबा. 9822679862


