………………………………
Lord Vitthal | श्रावण सोमवार समाप्ती निमीत्त श्रीविठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात फुलांची आरास
………………………………………
Pandharpur Live Online : खंजीर खुसपणं या शब्दावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. चंद्रकांतदादांना आम्ही शिवचरित्रं पाठवू. शिवचरित्रं त्यांनी वाचलं पाहिजे. सेतू माधवराव पगडींचं शिवचरित्रं पाठवू. बाबासाहेब पुरंदेरंचं पाठवू. रियासतकारांचं पाठवू. अनेक शिवचरित्रांचे खंडं आले आहेत. यातील एखादं पाठवू. त्यांनी ते वाचावं. इतिहासात कोथळा काढणं म्हणजे नक्की काय? त्याचा त्यांनी अभ्यास केला तर आम्ही चर्चा करू. मी इतिहासाचा अभ्यासक आहे. आम्ही नुसतं राजकारण करत नाही. आम्ही इतिहास समजून घेतो. इतिहास घडवतो. आम्ही इतिहास चिवडत बसत नाही, अशी टीका त्यांनी केली.

राजकारणात कोणी साधूसंत असतं का? तुमचं आज राज्यात सरकार नसेल. पण आमचं तीन पक्षाचं सरकार आहे ना, तरीही तुम्हाला तुमचं सरकार यावसं वाटतं. याला काय म्हणतात? हे राजकारण आहे, असं सांगतानाच दुसऱ्याने केलं तर पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही भल्या पहाटे अजित पवारांना घेऊन सरकार बनवलं ते राजकारण. दुसरं कोणी केलं असतं तर पाठीत खंजीर खुपसला. राजकारणात देशभरात अशा गोष्टी सुरू असतात. मध्यप्रदेशात माधवरावांच्या सुपुत्रांना काँग्रेसपासून फोडलं. ते राजकारण. दुसरं कोणी केलं असतं तर खंजीर खुपसला. हे शब्द आता राजकारणात कोणी वापरू नयेत. वापरले जाऊ नयेत. राजकारण गेल्या काही वर्षापासून याच पद्धतीने सुरू आहे. याला पारदर्शक राजकारण म्हणत नाही, असं राऊत म्हणाले.

यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आलेल्या नोटिशीवर भाष्य केलं. अनिल देशमुख ला पहिल्यांदा नोटीस आलेली नाही. लूक आऊट नोटीसही अनेकदा याच्या आधी बजावली गेली आहे. कायद्याची लढाई सध्याची सुरू आहे. कोर्टात केस प्रलंबित आहे. त्यावर अधिक बोलणं योग्य नाही. त्यात वेट अँड वॉच करणं महत्त्वाचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

कुणाचा कोथळा बाहेर काढणार मी ते सांगायला पाहिजे ना. ते पाठित खंजीर खुपसणार होते. चंद्रकांत पाटील पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा करत होते. त्यावर आपली परंपरा करा काय आहे हे मी त्यांना समजावत होतो. ती आपली परंपरा नाही, आपण समोरून वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून वार केला हे मी सांगत होतो. आता चंद्रकांत पाटील कुणावर खटला दाखल करणार याची माहिती घ्यावी लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला.

