येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या ठिकाणी आषाढी वारी निमित्त ठराविक विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या पोशाखामध्ये व इतर सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाखामध्ये आज ‘संतांची मांदियाळी‘ या थीम द्वारे दिंडी सोहळा उत्साहात साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांना सजवलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पूजन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. श्रीविठ्ठल, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या नाम गजरामध्ये पालखी पूजन संपन्न होऊन श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहामध्ये प्रशालेच्या परिसरात दिंडीला सुरूवात केली. या दिंडीमध्ये पालखी बरोबर रिंगण सोहळ्यासाठी असणारा अश्व देखील उपस्थित होता. परिसरातील दिंडी पूर्ण करून प्रशालेच्या प्रशस्त प्रांगणामध्ये येऊन अतिशय सुंदर व शिस्तबद्ध असे रिंगण तयार करण्यात आले. या रिंगणामध्ये मध्यभागी पालखी ठेवून या पालखीचे पूजन प्रशालेच्या प्राचार्या मा. प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विठ्ठलाचा नाम गजर व माऊलींच्या जयघोषणामध्ये अश्वाने धाव घेत रिंगण पूर्ण केले. यानंतर सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी देखील विठ्ठलाच्या नामघोषमध्ये रिंगण करत ठेका धरला. अतिशय उत्साही वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले असताना सर्व पालक व विद्यार्थी यांनी देखील फुगडी खेळून आपला आनंद द्विगुणीत केला. अतिशय उत्साही वातावरणामध्ये सर्व विद्यार्थी बालगोपाळांप्रमाणे या दिंडी सोहळ्याचा आनंद घेत होते.
शेवटी सर्व विद्यार्थ्यांना रिंगण सोहळ्यानिमित्त प्रसाद वाटप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी प्रोत्साहन दिले व सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेऊन हा दिंडी सोहळा अतिशय उत्साहात संपन्न केला. या दिंडी सोहळ्यास संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री. रोहन परिचारक व संस्थेचे रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके यांनी शुभेच्छा दिल्या.


