👁 7 Views

सोलापूर; माढा, पंढरपूर, करमाळा ढगफुटीसदृश पाऊस हातातोंडाशी आलेल्या पिकांना फटका

 सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माढा आणि करमाळा तालुक्यात गुरुवारी रात्रीपासून ढगफुटीसदृश पाऊस झाला असून, सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. माढा तालुक्यातील बेंद ओढय़ाला पूर आला असून, अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती.


तर, ठिकठिकाणी हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. उसासह फळबागांनाही या पावसाचा फटका बसला आहे.

माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे 90 मिमी, रांजणी 81 मिमी, रोपळे 126 मिमी, निमगाव टें. 83 मिमी, तर मोडनिंब येथे 65 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 


या मंडळातील अनेक गावांतील शेती आणि पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. बादलेवाडी, ढवळे, दहिवली, कंदर, शेडशिंगे, जाखले, उपळवटे, चोभेपिंपरी, भोगेवाडी, रोपळे, कन्हेरगाव, नाडी, लोणी, मुंगशी, सापटणे टें., निमगाव टें., पिंपळनेर या गावातील केळी, पेरू, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. तर नव्याने लागण झालेल्या उसात पाणी साचल्याने तेथे दुबार लागवडीचे संकट ओढवले आहे.

माढा-कुर्डूवाडी रस्त्यावर भोसरे गावच्या हद्दीतून बेंद ओढय़ाला आलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली. या ओढय़ावरील पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. त्यातच पर्यायी रस्तादेखील वाहून गेल्याने ही वाहतूक बंद पडली. 


त्यामुळे सकाळी वैराग, सोलापूर येथून कुर्डूवाडीकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आली. पावसाचे पाणी कुर्डूवाडी आगारात शिरल्याने एसटी बसेस जागेवरच अडकून राहिल्या होत्या. त्यामुळे तालुकांतर्गत एसटी वाहतूक ठप्प झाली होती. जाखले आणि चोभेपिंपरी गावच्या शीवहद्दीवर असलेला पाझर तलाव फुटल्याने त्याखाली असलेल्या चोभेपिंपरी गावाच्या हद्दीतील अनेक विहिरी गाळाने बुजल्या आहेत.

कुर्डूवाडीतील टेंभुर्णी रोड परिसरातील ओढय़ालगत असणाऱया वस्त्यांमधील प्रत्येक घरात कमरेएवढे पाणी शिरले होते. अथर्व हॉटेल, जिव्हाळा शाळा व परिसर पूर्णपणे पाण्याने वेढला गेला होता. त्यामुळे टेंभुर्णीकडून कुर्डूवाडी शहरात येणारी वाहतूक ठप्प झाली होती. तर, कुर्डू शिवारातील गोरे वस्तीनजीकच्या रेल्वे पुलाला केवळ दीड फूट पाणी टेकायचे बाकी होते. पंढरपूर रोडवरील बसस्थानकानजीकच्या डॉ. कुंतल शहानगर, एसटी आगार, आगारप्रमुखाचे निवासस्थान, तर गोरेवस्ती येथीलही घराघरांत सुमारे तीन ते चार फूट पाणी शिरले होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *