सोलापूर रेल्वे स्थानकावर एका तरुणीने वातानुकूलित प्रतीक्षालयाची प्रचंड तोडफोड केल्याची घटना सकाळी घडली आहे. या तोडफोडीनंतर संबंधित तरुणीने या काचा तेथे असणाऱया महिलांच्या दिशेने फेकल्या
सोलापूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1समोर वातानुकूलित प्रतीक्षालय आहे. सकाळी या प्रतीक्षालयात तुरळक प्रवासी होते.
या वेटिंग रूममध्ये असताना राजनंदिनीने प्रतीक्षालयात येत हातातील लोखंडी रॉडने दरवाजा व खिडक्यांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. यामुळे वेटिंग रूमसमोर काचांचा खच पडला होता. यामुळे प्रवाशांत घबराट निर्माण झाली होती. दरम्यान, तेथीलच पाच-सहा लोकांनी तिला पकडून रेल्वे पोलीस ठाण्यात आणून बसविले.
त्यानंतर सगळी यंत्रणा जागी झाली. लोहमार्ग पोलीस ठाण्यात आल्यानंतरही तेथे महिला पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे पुरुष कर्मचाऱयांना विचारपूस करताना प्रचंड त्रास देत तिने आत्ताच्या आत्ता आपल्याला गोळी हवी आहे, असे सांगत एका गोळीचे नाव लिहून रेल्वे पोलिसांना पळवापळवीचे काम केले. पिण्यासाठी दिलेला चहाही फेकून देत संपूर्ण ठाण्यात एकच गोंधळ घातला.
ही तरुणी याआधीही रेल्वे स्टेशनच्या आवारात आढळली होती. त्यावेळी तिला समजावून परत पाठविले होते. मात्र, आज अचानक तिला काही लोकांनी पकडून आणल्यानंतर तिने तोडफोड केल्याचे आम्हाला समजले.
तिची चौकशी सुरू असून, नेमके कशामुळे तिने हा प्रकार केला, याची माहिती तिच्यासह तिच्या कुटुंबीयांकडून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.




