पिंपरी – हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या दोघांनी सूपची ऑर्डर दिली. मात्र, सूपमध्ये भात आढळल्याने आरोपींनी वेटरला जाब विचारला.
यावरून झालेल्या मारहाणीत वेटरचा खून झाल्याची घटना पिंपळे सौदागर येथे घडली.
मंगेश संजय पोसते (वय १९, रा. पिंपळे सौदागर, मूळ-जालना) असे खून झालेल्या आरोपीचे नाव आहे. मंगेश हे हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचे. दरम्यान, या हॉटेलात दोघे आरोपी जेवणासाठी आले.
त्यांनी सुरुवातीला सूपची ऑर्डर दिली. मात्र, सूप मध्ये काही प्रमाणात भात आढळला.
याबाबत आरोपींनी मंगेश यांना जाब विचारला. या दरम्यान झालेल्या वादात आरोपींनी मंगेश यांच्या डोक्यात दंडक्याने मारहाण केली.
डोक्यात वर्मी घाव बसल्याने मंगेश यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.





