श्रद्धा वालकर खून प्रकरण समोर आल्यानंतर क्रौर्याची सीमा गाठणारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये एका व्यक्तीने पत्नीचा खून करुन तिचे दोन तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पत्नीला संपवल्यानंतर तिच्या अवयवाचे तुकडे आरोपीने जंगलातील विविध भागांमध्ये पुरल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
राम किशोर पटेल असं आरोपीचं नाव आहे. चारित्र्याचा संशयावरुन आरोपीने पत्नी सरस्वतीचा खून केला आहे.
आरोपीने १३ नोव्हेंबरला भाऊ आणि त्याची पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे.
बेपत्ता प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना १५ नोव्हेंबरला गावालगत असलेल्या जंगलात महिलेचे कपडे आढळल्याची माहिती मिळाली होती. हे कपडे आरोपीच्या पीडित पत्नीचे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी जंगलात शोध घेतला. यावेळी महिलेचे मुंडके आणि धड आढळून आले.
या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी पतीला नरसिंगपूरच्या करेली भागातून अटक करण्यात आली आहे. “आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे.
चारित्र्याच्या संशयावरुन आरोपीने पत्नीचा जंगलात कुऱ्हाडीने शिरच्छेद केला आहे. त्यानंतर आरोपीने मुंडकं आणि धड जमिनीत पुरलं.
या खून प्रकरणात वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे”, अशी माहिती पोलीस अधीक्षक कुमार प्रतीक यांनी दिली आहे.






