शहरातील नऊ वर्षाच्या निष्पाप बालकाची करवतीने हात कापून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मनमाडमध्ये उघडकीस आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील नेहरू भवनाजवळ राहणारा लोकेश सोनवणे हा नऊ वर्षाचा बालक बुधवारी सकाळपासून बेपत्ता होता.
त्याच्या पालकांनी सर्व ठिकाणी त्याचा शोध घेतला. मात्र, तो मिळाला नाही. शेवटी पालकांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुरुवारी एका बालकाचा मृतदेह रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर झुडपात रेल्वे रुळापासून काही अंतरांवर नागरिकांना दिसल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, रेल्वे पोलिस निरीक्षक जोगदंड यांच्यासह आरपीएफ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मृतदेह बेपत्ता लोकशचा असल्याचे निष्पन्न झाले.
त्याचा एक हात कापलेला पाहून पोलिसांनाही धक्का बसला. तसेच त्याच्या मृतदेहाजवळ एक करवतही पोलिसांना सापडली. पोलिसांनी पंचनामा करून त्याचा मृतदेह
शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. आपला चिमुकला गमावल्याने सोनवणे कुटुंब अक्षरश: दु:खात बुडाले आहे.





