बदलापूरमध्ये उसने दिलेले पैसे परत मागितल्याने एका व्यक्तीची गळा दाबुन हत्या करण्यात आली आहे. मयत व्यक्तीचे नाव श्रवणकुमार असून तो बदलापूर पश्चिम वडवली चौकात राहत होता
मिळालेल्या माहितीनुसार, श्रवणकुमार आणि प्रकाश हे दोघे मित्र होते. दोघेही एकाच गॅस एजन्सीत काम करत होते. काही दिवसांपूर्वी प्रकाशचा भाऊ बुधाजी बिष्णोई याने श्रवणकुमार कडून काही पैसे उसने घेतले. बरेच दिवस झाले तरी बुधाजी पैसे परत देत नसल्याने श्रवणकुमारने त्याला फोन केला. तसेच पैसे परत करण्याचा तगादा लावत त्याला शिवीगाळ केली.
शिवीगाळ केल्याने बुधाजीला फार राग आला त्यामुळे त्याने भाऊ प्रकाश आणि साथीदार दिनेशसह श्रवणकुमारची हत्या करण्याचा कट रचला. हे तिघे ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता श्रवणकुमारच्या घरी आले. त्यांनी त्याला काठीने मारहाण केली. तसेच त्याचा गळा दाबून हत्या केली. श्रवणकुमारचा मृत्यू झाल्यावर त्यांनी मृतदेह तिथेच टाकून पळ काढला.
पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हत्या केल्यावर पळून जाताना तिघेही सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाले होते. घटनेचा तपास करून पोलिसांनी बुधाजी बिष्णोई, प्रकाश बिष्णोई आणि दिनेश बिष्णोई यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान या तिघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला तसेच काल सत्र न्यायालयात त्यांच्यावर सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



