औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावात एक धक्कादायक घटना समोर आली असून, पोटच्या लेकाने आपल्याच जन्मदात्या बापाचा जीव घेतला आहे.
वडिलांच्या छातीवर बसून केलेल्या बेदम मारहाणीत वडिलांचा जागीच मृत्यू आहे. तर परिसरातील नागरिकांनी याबाबत माहिती मिळताच आरोपी मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अशरफ खॉन आमीन खॉन (वय 65 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव असून, असद अशरफ खॉन (वय 35 वर्षे) असे बापाचा जीव घेणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिडकीन गावातील आझाद चौकात राहणारे अशरफ खॉन यांच्यावर काही दिवसांपूर्वी मोठी शस्त्रक्रिया झाल्याने ते सद्या आजारी होते.
त्यामुळे ते घरातच आराम करत होते. दरम्यान आज दुपारच्या सुमारास त्यांचा मुलगा असद खॉन यांनी अचानक आपल्या वडिलांना मारहाण सुरु केली. मात्र आधीच आजारी असल्याने आणि मुलाने केलेल्या बेदम मारहाणीत अशरफ यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आरोपी असदला बिडकीन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



