शहरातील दिल्लीगेट भागात एका टेम्पोतून दुसर्या टेम्पोत गुटखा टाकत असताना छापा टाकत 9 लाख 67 हजारांचा गुटखा जप्त केला असून, दोघांना अटक केली.
कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक व शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांच्या पथकाने शनिवारी (दि.17) केली. शहर परिसरातील पोलिस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथके सायलेंट मोडवरच असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा पहावयास मिळाले. दीपक पोपट यादव (रा.ब्राम्हण गल्ली, नगर), हरिष रामशरण खंदुजा (रा.पंचवटी कोल्हार) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
दिल्लीगेट येथून मोठ्या प्रमाणात गुटखा घेऊन जात असल्याची माहिती आयजींच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार आयजींच्या आणि पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांच्या पथकाने दिल्लीगेट येथे माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकत ही कारवाई केली.
एका टेम्पोमधून दुसर्या टेम्पोमध्ये गुटखा भरल्या जात असताना पोलिसांनी दोघांना अटक केली. या कारवाईत 9 लाख 67 हजारांचा गुटखा व 7 लाखांच्या दोन वाहने असा 16 लाख 67 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तोफखाना पोलिस ठाण्यात हजर झाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.



