अकरा महिन्यांपूर्वी १२ तोळे साेने, चार लाख रुपये देऊन लग्नात ३५ ते ४० लाख रुपये खर्च करीत उच्चशिक्षित तरुणीचा विवाह वैजापूर येथील अभियंत्यासोबत धुमधडाक्यात लावून दिला.
लग्नानंतर तीन दिवसच विवाहितेला चांगली वागणूक दिली. त्यानंतर पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून २५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी छळ सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात २४ डिसेंबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
पती आकाश जयचंद कासलीवाल, सासू नीता कासलीवाल आणि नणंद स्नेहल कासलीवाल (सर्व रा. बालाजीनगर, वैजापूर) अशी आरोपींची नावे आहेत. शहरातील उच्चशिक्षित अंकिताचा आकाश याच्यासोबत ७ फेब्रुवारी २०२२ रोजी विवाह झाला. अंकिताच्या विवाहात तिच्या वडिलांनी ३५ ते ४० लाख रुपये खर्च केले. आकाशच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार वैजापूर येथील वैष्णवी लॉन्स येथे विवाह लावून दिला. सासरी गेल्यानंतर अंकिताला सुरुवातीचे तीन दिवसच चांगली वागणूक मिळाली. लग्नानंतर १५ दिवसांत आकाश पुण्यात नोकरीच्या ठिकाणी गेला. त्याने पत्नीला सोबत नेले नाही. नंतर एकदा नेले तर सासूने खर्चावरून शिवीगाळ केली. अंकिताला माहेरीसुद्धा बोलू दिले जात नव्हते. तसेच पुण्याला आकाशला फ्लॅट घ्यायचा होता. त्यासाठी त्याने माहेरहून २५ लाख रुपये घेऊन येण्याची मागणी सुरू केली.
अंकिताने वेळोवेळी सांगितले की, माझ्या वडिलांकडे पैसे नाहीत, लग्नात खूप खर्च झाला आहे. काही दिवस थांबा. तरीही सासरचे काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. किरकोळ कारणावरून अंकिताला सतत मारहाण करण्यात येऊ लागली. याविषयीची माहिती तिने माहेरी दिली. तेव्हा तिच्या वडिलांनीही पतीसह सासूची समजूत घालण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा नोंदवून तपास उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड करीत आहेत.
लग्न ठरताना पती आकाशसह त्याच्या कुटुंबाने अंकिताला लग्नानंतरही सीएचे शिक्षण पूर्ण करून देण्याची हमी दिली होती. मात्र, लग्नानंतर अंकिताने सीएची परीक्षा द्यायची असल्याचे पतीला सांगताच त्याने शिवीगाळ केली. तसेच सासूनेही यापुढे तुला शिकविण्यात येणार नाही, असे सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.



