डोंबिवली – फेसबुकवर पुरुषांशी मैत्री करत त्यांना हॉटेलमध्ये बोलावून दारु पाजून नशेत धुंद करत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरून ती न्यायची.
डोंबिवलीतील केबल व्यावसायिक देखील तिच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडील सोन्याच्या दागिन्यांसह रिव्हॉल्व्हर देखील चोरून नेली. रिव्हॉल्व्हर चोरीला गेल्याने मानपाडा पोलिसांनी तपास करत आरोपी महिला व तिच्या साथीदाराला गोवा येथून अटक केली. समृद्धी खडपकर (वय 29) व विलेंडर डिकोस्टा (वय 34) असे अटक आरोपींचे नाव आहे. सदर महिलेने अशाच पद्धतीने 12 जणांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून त्यांच्याकडन 16 मोबाईल, रिव्हॉल्व्हर, घड्याळ, सोन्याचे दागिने असा एकूण 20 लाख 81 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असल्याची माहिती डोंबिवली सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली.
सागावं येथे राहणारे केबल व्यावसायिक महेश पाटील यांची फेसबुकवर संस्कृती खेरमनकर नावाच्या महिलेची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली होती. त्यांनी तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर त्यांच्यात संवाद सुरु झाला. ही मैत्री पुढे वाढल्यानंतर महेश व संस्कृती हे 20 डिसेंबरला खोणी येथील कोहीनुर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी बोलविले. तेथे एका रुममध्ये जेवण केल्यानंतर त्यांनी मद्य प्राशन केले. रात्री 11 च्या सुमारास महेश हे लघुशंकेसाठी गेले असता या संधीचा फायदा घेत संस्कृती हिने महेश यांचे रिव्हॉल्व्हर, मोबाईल, सोन्याचे दागिने असा एकूण 4 लाख 75 हजाराचा ऐवज चोरुन तेथून पळ काढला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मानपाडा पोलिस ठाण्यात संस्कृती हिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
तक्रार दाखल झाल्यानंतर मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक अविनाश वनवे, सुनिल तारमाळे यांसह सुशांत तांबे, सुनिल पवार, राजेंद्रकुमार खिलारे, दिपक गडगे, यलप्पा पाटील यांच्या पथकाने महिलेचा शोध सुरु केला. महेश यांच्या फेसबुक खात्यावरुन महिलेच्या फेसबुक खाते चेक करत तिची खरी ओळख काढली.
डोंबिवलीतील रेल्वे पोलिस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ती महिला खार येथे राहण्यास असल्याचे पोलिसांना समजले. खार येथे तिचा शोध घेतला असता गोवा राज्यात ती रहायला गेल्याची माहिती मिळाली. गोवा येथे पोलिसांचे एक पथक रवाना झाले. तिथे तिच्या घरी चौकशी केली असता पोलिसांना तिचा मित्र विलेंडरची माहिती मिळाली. विलेंडरला पोलिसांनी 26 डिसेंबरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता गोवा येथील पेड म्हापसा येथून 28 डिसेंबरला संस्कृती हिला पोलिसांनी अटक केली.



