भाविकांच्या सुविधेसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासातील खोल्या नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित
टिसीएस कंपनीकडून मोफत संगणक प्रणाली
अधिकृत संकेतस्थळावरून भाविकांना करता येणार ऑनलाईन नोंदणी
पंढरपूर दि.28:- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहरात श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे. या भक्तनिवासातील खोल्या नोंदणी करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून, मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर भाविकांना ऑनलाईन नोंदणी करता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
मंदिर समितीने कार्यालयीन कामकाज गतीमान करण्याच्या दृष्टीने व भाविकांना ऑनलाईन सोई सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व संगणक प्रणाली सेवाभावी तत्वावर मोफत उपलब्ध करून देण्याची तयारी टिसीएस कंपनीने दर्शविली होती. त्याबाबत मंदिर समितीची दिनांक 3 मार्च रोजी सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये टिसीएस कंपनीकडून संगणक प्रणाली विकसित करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे ऑनलाईन पध्दतीने खोल्या नोंदणी करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आता भाविकांना https://online.vitthalrukminimandir.org.in/#/login या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून घरबसल्या खोली नोंदणी करता येणार आहे.
मंदिर समितीचे पंढरपूर शहरात सर्व्हे नं.59 येथे सुसज्ज भक्तनिवास इमारत असून, यामध्ये गरम पाण्याची सोय, उद्वाहन, प्रशस्त पार्कींग, मिनरल वॉटर, वातानुकुलित यंत्रणा, तबक उद्यान, उपहारगृह, अग्निशमन यंत्रणा, सुरक्षा , स्वच्छता व्यवस्था व इतर अनुषंगीक सोई सुविधा उपलब्ध असून, या इमारतीस ग्रीन बिल्डींग प्रमाणपत्र प्राप्त आहे.
ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास भक्तनिवास येथून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 -228888 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा.

तरी भाविकांनी यापुढे मंदिर समितीच्या भक्त निवास येथे निवासासाठी वरील अधिकृत संकेतस्थळावरून किंवा ऑफलाईन पद्धतीने खोली काऊंटर बुकिंग करावे असे आवाहन यावेळी श्रोत्री यांनी केले