सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एक शेतकरी आपल्या शेतात उसाला पाणी देत असताना अचानक मातीतून एक मानवी पाय बाहेर आल्याचं समोर आलं आहे.
प्रकार पाहताच शेतकरी हादरून गेला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलिसांना उसाच्या शेतीत पुरलेला एक मृतदेह आढळला. या प्रकरणी पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता एक भयंकर हत्याकांड उघडकीस आलं आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर, उसाच्या शेतीत एका वृद्धाचा मृतदेह पुरल्याचं समोर आलं. वृद्धाच्या गळ्यावर गळा दाबल्याच्या खुना होत्या. त्यांचे हातपाय बांधून गळा आवळल्याचं प्राथमिक तपासांत समोर आलं होतं. पण मृत व्यक्ती नक्की कोण आहे? याची माहिती पोलिसांना मिळाली नव्हती. अखेर मयत सुरेश शिंदे यांचा मुलगा गोविंद शिंदे यानं ओळख पटवल्यानंतर मृतदेहाची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर त्यांची हत्या कुणी आणि कशासाठी केली? हे शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. पण पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला आहे.
सोनसाखळी आणि रोकड पैशांसाठी वृद्ध सुरेश शिंदे यांची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सुरेश शिंदे यांच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी दिलीप निवृत्त झोंबाडे आणि राहुल नागेश गायकवाड असं दोघांना अटक केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुरेश शिंदे हे 17 फेब्रुवारी रोजी बार्शी वरून बाभूळगाव येथे येण्यासाठी निघाले होते. मात्र ते घरी आलेच नाही. तेव्हापासून ते बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक ठिकाणी त्यांचा शोध घेतला, पण ते कुठे आहेत, याची काहीच माहिती नातेवाईकांना मिळाली नाही.
अखेर 20 फेब्रुवारी रोजी बाभूळगाव येथील शिवारात सुरेश शिंदे यांचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. बाभुळगाव येथील शेतकरी नितीन शिंदे हे आपल्या शेतात उसाची लागवड करतात. घटनेच्या दिवशी ते उसाच्या सरी भिजवत होते. यावेळी उसाला पाणी देताना एक मानवी पाय मातीतून बाहेर आल्याचं त्यांना दिसलं. यानंतर त्यांनी तातडीने घटनेची माहिती बार्शी पोलिसांना दिली. बार्शी तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासला केली होती सुरुवात
शेतात पुरलेला मृतदेहाच्या दोन्ही हाताला शर्टने बांधल्याचे समोर आलं. तर मयत व्यक्तीचा गळा आवळल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. मयताचा मुलगा गोविंद शिंदे याने ओळख पटवल्यानंतर सुरेश शिंदे यांचा हा मृतदेह असल्याची ओळख पटली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर खुनाचा उलगडा झाला. सुरेश यांच्या घराशेजारी राहणाऱ्या दिलीप निवृत्त झोंबाडे आणि गावातच सालगडी म्हणून काम करणाऱ्या राहुल गायकवाड यांचा खुनात सहभाग असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानुसार पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्यांनी सोनसाखळी आणि रोकड पैशांसाठी सुरेश शिंदे यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने उसाच्या शेतात प्रेत पुरल्याचं सांगितलं. दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केलं असता त्यांना सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास बार्शी पोलीस करत आहेत.