पिंपरी; वाढदिवसाच्या कार्यक्रमात झालेल्या भांडणात मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नात सराईत गुन्हेगाराने पिस्तूलातून गोळी झाडून एका तरुणाचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 13) रात्री साडेअकराच्या सुमारास देहूरोड येथील गांधीनगर येथे घडली.
विक्रम गुरूस्वामी रेड्डी (वय 37, रा. गांधीनगर, देहूरोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नंदकिशोर रामपवित्र यादव (रा. आंबेडकरनगर, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. रजिया समीर शेख (49, रा. गांधीनगर, देहूरोड) हिला अटक करण्यात आली आहे. तिचा मुलगा शाबीर समीर शेख (27, रा. कोंढवा) तसेच फैजल शेख (वय 30) आणि जॉन ऊर्फ साई तेजा चित्तामल्ला (वय 28) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी पसार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदकिशोर यादव यांचा भाऊ राजकुमार यांच्या मुलीचा वाढदिवस गुरुवारी (दि. 13) होता. वाढदिवसानिमित्त घरासमोर मंडप टाकण्यात आला होता. सर्व जण मंडपाबाहेर उभे असताना आरोपी तेथे आले. आरोपी शाबीर याने नंदकिशोर यांना उद्देशून ‘तू मोठी पार्टी देतो आहेस, तुला मस्ती आली आहे’ असे म्हणत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. फैजलने खुर्ची फेकून मारली. भांडण सोडवण्यासाठी राजकुमार आणि विक्रम मध्यस्थी करू लागले.
या वेळी रजिया, जॉन आणि फैजल यांनी दगडफेक केली. वातावरण चिघळल्यामुळे विक्रम दुचाकीवरून निघत असताना शाबीर याने त्याच्या दिशेने गोळी झाडली. गोळी विक्रमच्या छातीत लागली. त्यानंतर शाबीरने हवेत दोन गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत विक्रमला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात फिर्यादी नंदकिशोर यादव यांच्या नाकाला मार लागल्याने ते जखमी झाले आहेत. आरोपी शाबीर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर कोंढवा आणि देहूरोड पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. तसेच, जॉन याच्यावर तीन गुन्हे आहेत. या घटनेमुळे गांधीनगर आणि आंबेडकरनगर परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विक्रम बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, देहूरोडया हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य आहे की, इतर कोणत्या कारणामुळे ही घटना घडली, याचा तपास केला जात आहे. पसार आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.