हिंगोली: शहरात कमी किंमतीत गहू खरेदी करून त्याचे पिठ करून विक्री केल्यानंतर वाढीव नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवित व्यापाऱ्याची ५१ लाख रुपयांची फसवणुक करण्यात आली. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर शुक्रवारी (ता.१४) रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पलटन भागातील व्यापारी रऊफ खान पठाण यांना पाच जणांनी ‘समर्थ फ्लोअर मिल’ नावाची पिठ तयार करण्याची फॅक्ट्री असल्याचे सांगितले. या फ्लोअर मिलमध्ये कमी किंमतीत खरेदी केलेल्या गव्हाचे पिठ तयार करून विक्री केल्यानंतर अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखविले.
यामध्ये चौघेजण हिंगोली शहरातील असल्यामुळे रऊफखान यांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला. त्यानंतर या पाच जणांनी रऊफखान यांना नागपूर येथून कमी किंमतीच गहू खरेदीची निवीदा काढली जात असून त्यासाठी अनामत रक्कम भरावी लागत असल्याचे सांगितले.
त्यासाठी तातडीने पैसे देण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी पैसेही दिले. तीन ते चार वेळा त्यांनी व इतर काही व्यापाऱ्यांनी तब्बल ५१ लाख ३० हजार रुपये दिले. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत त्यांनी ही रक्कम दिली होती.