सोलापूर; येथील न्यू बुधवार पेठ परिसरातील २२ वर्षीय तरुणी २५ जानेवारीपासून बेपत्ता आहे. तर भवानी पेठेतील १९ वर्षीय तरुणी देखील २८ जानेवारीला बेपत्ता झाली आहे. तसेच पुण्यातील ४४ वर्षीय महिला सोलापुरात येऊन रुपाभवानी मंदिरात असल्याचे सांगितल्यापासून बेपत्ता आहे.
या प्रकरणी त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांत फिर्यादी नोंदविल्या आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पुण्यातील मांजरी बुद्रूक येथील ४४ वर्षीय महिला देवदर्शनाला जाऊन येते म्हणून ३१ जानेवारीला घरातून निघाली. १ फेब्रुवारीला सायंकाळी पाचच्या सुमारास सोलापुरातील रुपाभवानी मंदिरात असल्याचे त्या महिलेने कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर ती महिला संपर्क क्षेत्राबाहेर आहे.
या प्रकरणी त्या महिलेच्या कुटुंबीयांनी जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली आहे. दुसरीकडे न्यू बुधवार पेठेतील २२ वर्षीय तरुणी २५ जानेवारीला सकाळी नऊच्या सुमारास घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती पुन्हा घरीच आली नाही. चिंतेतील कुटुंबीयांनी जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली आहे.
भवानी पेठेतील १९ वर्षीय तरुणी २८ जानेवारीला मध्यरात्री एकच्या सुमारास घरातून निघून गेली. तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. तिच्या कुटुंबीयांनी जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद नोंदविली आहे.