दोन तस्करांना बेड्या ठोकून १० किलो गांजा हस्तगत

दोन तस्करांना बेड्या ठोकून १० किलो गांजा हस्तगत

Loading

कोल्हापूर: स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने शहर, ग्रामीण भागात अमली पदार्थाची तस्करी करणार्‍या राजस्थानातील दोघा तस्करांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या. कैलाशसिंह उदयसिंह राजपूत (22) व किशनसिंह दौलतसिंह राजपूत (21, रा.जालोकी मंदार, खमनोर, जि. राजसमंद, राजस्थान) अशी त्यांची नावे आहेत. संशयिताकडून दोन लाख रुपयांचा 10 किलो गांजा हस्तगत केला आहे.

पाचगावसह परिसरात काही काळ भाडेकरू म्हणून वास्तव्यास असलेले संशयित गोकुळ शिरगाव येथील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात कामाला होते. आठ महिन्यांपूर्वी त्यांनी राजस्थान गाठले होते. अधूनमधून शहरासह ग्रामीण भागात येऊन राजस्थानातून आणलेल्या गांजासह अमली पदार्थाची तस्करी करून पुन्हा गावाकडे परतायचे, असा त्यांचा क्रम होता.

शनिवारी सकाळी मोरेवाडी (ता. करवीर) येथील मध्यवर्ती चौकात एका हॉटेलजवळ संशयास्पद वावरणार्‍या या दोन परप्रांतीयांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले. अंग झडतीत त्यांच्याकडून 10 किलो गांजा, दोन मोबाईल असा दोन लाख 21 हजार 740 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. राजारामपुरी पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोकुळ शिरगाव, मोरेवाडी परिसरात अमली पदार्थांसह गांजा तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती. संशयितांच्या हालचालीवर पोलिसांची नजर होती. उपनिरीक्षक चेतन मसुटगे, कृष्णात पिंगळे, विशाल खराडेसह पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

पथकाची दिशाभूल करणार्‍या संशयितांना प्रसाद मिळताच त्यांनी गांजा तस्करीची कबुली दिली. चौकशीत काही स्थानिक गुन्हेगारांचीही नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्या मदतीने गांजा तस्करीचे रॅकेट चालविले जात असल्याची माहितीही पुढे आली आहे. स्थानिक संशयितांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक कळमकर यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *