मस्साजोग (जि.बीड) चे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्या प्रकरणानंतर देशभर गाजत असलेल्या आणि खंडणी प्रकरणात अटक झालेल्या वाल्मीक कराड याच्या दहशतीचे एकेक कारनामे समोर येत असतानाच त्याने पंढरपूरसह आसपासच्या भागातील १४० शेतकरी,
वाहन मालकांची ११ कोटी २० लाखांची फसवणूक करीत अनेकांना मारहाणही केल्याचा आरोप संबंधितांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. ऊस तोडणी (हार्वेस्टींग) यंत्रांना प्रत्येकी ३६ लाख रुपये अनुदान मिळवून देतो,
असे सांगून कराड याने प्रत्येकाकडून ८ लाख रुपये घेतल्याची लेखी तक्रार शनिवारी (दि. ११) सायंकाळी अनेक शेतकरी, वाहन मालकांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्याकडे दिली आहे.
उपरी येथील शेतकरी दिलीप रामचंद्र नागणे हे शेतकरी हार्वेस्टींग मशीनद्वारे ऊस तोडणीचे काम करतात. तत्कालीन कृषिमंत्री आपल्या जवळचे असून हार्वेस्टींग मशीनला प्रत्येकी ३६ लाख रुपये अनुदान देतो, असे सांगून कराड याने दिलीप नागणे यांच्यासह अन्य मशीन मालकांना प्रत्येकी ८ लाख रुपये देण्यास सांगितले.
त्यानुसार पंढरपूरसह सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, सांगली या भागातील १४० मशीन मालकांना कराड याने मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात बोलावून घेतले. त्या ठिकाणी सर्वांना अनुदानाचा विषय समजावून सांगण्यात आला.
त्यानंतर १४ सप्टेंबर २०२४ रोजी वाल्मीक कराड, जितेंद्र पालवे, नामदेव सानप यांनी पालघर येथील एका हॉटेलमध्ये प्रत्येकी ८ लाख रुपयेप्रमाणे ११ कोटी २० लाख रुपये घेतले.
दरम्यान, अनेक दिवस झाले तरी मशीनचे अनुदान मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचा संशय पैसे पैसे दिलेल्या लोकांना येऊ लागला. त्यामुळे अनेकांनी याबाबत कराड याला फोनद्वारे विचारणा केली असता त्याने त्यांना बीड येथे बोलावून घेतले.
त्या ठिकाणी संबंधितांना मारहाण करण्यात आली. अनेकांनी पळ काढून आपली सुटका करून घेतली. वाल्मीक कराड याच्या दहशतीमुळे आजवर आम्ही पोलिसात कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचेही दिलीप नागणे यांनी यावेळी सांगितले.
वाल्मीक कराड तसेच मंत्री धनंजय मुंडे यांची शेतकरी, मशीन मालकांनी मुंबईत भेट घेतल्याबाबतचे फोटो तसेच व्हिडीओ शनिवारी सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आले. तसेच पैसे मोजून देतानाचे काही फोटोही व्हायरल झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
फसवणूक झालेले शेतकरी, मशीन मालक विविध जिल्ह्यांमधील आहेत. यापैकी दिलीप रामचंद्र नागणे, अण्णासाहेब शिवाजी बागल, अमर भारत पालकर, विजय भारत पालकर, नागनाथ गणपत निंबाळकर, लक्ष्मण त्रिंबक सुडके, कल्याण बोधराज मोरे, शिवाजी सूर्यभान करळे – पाटील, प्रदीप शहाजी कदम, सदाशिव तात्याबा आवताडे, अमित अण्णासाहेब इंगळे, ब्रह्मदेव हणमंत पवार, सुरेश महादेव काळे, विश्वतेज हणमंत चव्हाण आदी १९ जणांनी सह्यानिशी तक्रारी अर्ज येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात दिला आहे.
वाल्मीक कराड याने फसवणूक व मारहाण केल्याबाबतची तक्रार घेऊन अनेकजण आले होते. यामधील १९ जणांचा लेखी तक्रारी अर्ज घेतला असून संबंधितांकडे आणखी जे काही पुरावे असतील ते घेऊन येण्यास सांगितले आहे. दोन-तीन दिवसांत त्यानुसार चौकशी केली जाईल. पुरावे व तथ्य आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही होईल. – शिरीष हुंबे, पोलीस निरीक्षक.