आईला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या मुलास जन्मदात्या बापाने रागाच्या भरात डोक्यात कुन्हाडीने दोन वेळा घाव घालून खून केला. ही घटना शुक्रवार १० जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास हातीद, ता.सांगोला येथील शिंपे वस्ती शाळेच्या पाठीमागे घडली.
रोहिदास रामा पवार (१८) असे मृताचे नाव आहे. याबाबत, बिरा बबन बंडगर (रा. हातीद, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी रामा किसन पवार (हातीद, ता. सांगोला) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता १०३ (१), ३५१ (३) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, हातीद येथील फिर्यादी यांच्या हद्दीतील सामायिक जमीन गट नंबर-२७७ मध्ये काटेरी झाडे झुडपे तोडून त्याचा कोळसा तयार करण्यासाठी पवार कुटुंबासह राहण्यास होते.
शनिवारी सायंकाळी मृत रोहिदास पवार याने त्याची आई गौरी पवार हीस कोणत्यातरी कारणावरून शिवीगाळ करून हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत होता.
त्यावेळी वडील दोघांचं भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेले असता मुलगा रोहिदास यांनी त्यांना ढकलून दिले. आपल्या डोळ्यासमोर मुलाने आपल्या पत्नीला मारहाण करत असल्याचा राग आरोपी यास सहन न झाल्याने त्याने स्वतः मुलगा रोहीदास याच्या डोक्यात कुन्हाडीने दोन वेळा घाव घालून त्याचा खून केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आज रविवार १२ जानेवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पुजारी करीत आहेत.