मार्केट यार्डातील डॉ. आंबेडकरनगर वसाहतीत किरकोळ वादातून दोन गटांत हाणामारी झाली. कोयते, तलवारी उगारून आरोपींनी दहशत माजविली. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
अनिलसिंग सिकंदरसिंग टाक (वय 21, रा. डॉ. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) याने याबाबत मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दत्ता भिसे (वय 29), नितीन भिसे (वय 19), विजय भिसे (वय 24, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता भिसे याने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.
त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पिंटूसिंग दुधानी (वय 38), अनिलसिंग सिकंदरसिंग टाक (वय 21), सिकंदरसिंग राजूसिंग टाक (वय 40), रोहित दुधानी (वय 19) तसेच एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिसे याचा पुतण्या आकाश याला आरोपी टाक यांनी मारहाण केली. त्यानंतर आकाश, त्याच्या वडिलांबरोबर मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाला होता. आरोपी अनिलसिंग टाकने त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. आरोपी पिंटूसिंग, अनिलसिंग, सिकंदरसिंग, रोहित यांना अटक करण्यात आली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन्ही गटांतील आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टाक आणि भिसे गटातील आठजणांच्या विरोधात यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.



