👁 6 Views

विहिरीत घसरून शेतकऱ्याचा मृत्यू

 

पातूर तालुक्यातील सस्ती येथे विहिरीतील मशीन बंद पडली. ती दुरुस्तीसाठी विहिरीत उतरून पायर्‍यावरून पाय घसरून पाण्यात पडल्याने एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला.


ही घटना सोमवार, 23 जानेवारी रोजी घडली. सस्ती येथील शेख लुकमान शेख दिलावर असे शेतकर्‍याचे नाव आहे.

सस्ती येथे शेख लुकमान शेख दिलावर यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे चार एकर शेती आहे. गत दोन-तीन दिवसांपासून शेतात कांदा लागवड सुरू आहे. शेख लुकमान हे त्यांच्या दोघा भावांसोबत शेतात कांदा लागवडीसाठी गेले होते. लागवड केलेल्या कांदा पिकाला पाणी देण्यासाठी बोअर मशीन सुरू केली, मात्र बोअर मशीन सुरू झाली नाही. 


ही बोअर मशीन शेतातील विहिरीत सोडलेली आहे. अचानक मशीन बंद पडल्याने शेख लुकमान हे विहिरीत लोखंडी पायर्‍यांनी खाली उतरले. मशीनची पाहणी केली, परत लोखंडी पायर्‍यांनी वर येत असताना अचानक त्यांचा तोल गेला, आणि ते पाण्यात पडले. पोहता येत नसल्यामुळे त्यांना आपला जीव गमावावा लागला. या घटनेत शेख लुकमान या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. त्यांच्या शेतातील विहीर जवळपास 70 फूट खोल असून, त्यामध्ये 40 फूट इतके पाणी आहे.


या  घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व गावकर्‍यांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेहाचे सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चान्नी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शेख लुकमान यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, चार भावंडं आणि मोठा परिवार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *