👁 7 Views

घरातुन ऑनलाईन कामाच्या आमिषाने महिलेची १९ लाखांची फसवणूक

 

एका खासगी कंपनीने घरातून काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली असून दररोज अडीच ते तीन हजार रुपये कमविण्याच्या आमिषाने मार्केट यार्डातील एका महिलेला चोरट्यांनी १९ लाख ५५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


प्रकरणी रँडस्टँड इंडिया प्रा. लि. चे संचालक, डिव्हाइन एंटरप्रायजेसचे मालक सुरेशकुमार भगोरा आणि केकट्रीपस डाॅटकाॅमचे संचालक यांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


आरोपींनी तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. घरातून काम करण्याची संधी असून दररोज अडीच ते तीन हजार रुपये कमाईचे आमिष आरोपींनी महिलेला दाखविले होते. त्यानंतर महिलेला ऑनलाइन काम देण्यात आले. महिलेने हे काम पूर्ण केले. आरोपी सुरेश भगेरा याने महिलेला पाच हजार रुपये ऑनलाइन पाठविण्यास सांगितले.


महिलेला ऑनलाइन कामात कमाईची संधी असल्याचे आमिष दाखविले. त्यानंतर महिलेकडे बतावणी करुन आरोपींनी वेळोवेळी १९ लाख ५५ हजार रुपये उकळले. फसवणूक ‌झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *