देवदर्शनासाठी तिरुपती येथे गेलेल्या सोलापुरातील चार तरुणांचा अपघाती मृत्यू झाला असून, पाचजण गंभीर जखमी आहेत. हे सर्व तरुण सोलापूर परिसरातील राहणारे असून, दोन दिवसांपूर्वी खासगी वाहन घेऊन तिरुपतीला गेले होते.
अनंत टेंबूरकर, मयूर मुत्तून, ऋषिकेश जंगम, अजय लट्टे (सर्व रा. कुमठेकर हॉस्पिटलमागे, जुळे सोलापूर) अशी मृत तरुणांची नावे असून, जखमींची पूर्ण नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. जखमींवर तिरुपती येथील रुईया रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
अनंत टेंबूरकर, मयूर मुत्तून, ऋषिकेश जंगम, अजय लट्टे व त्यांचे मित्र रोहन, राहुल, नार्लेकर, सुनील, अंबादास (पूर्ण नावे समजू शकली नाहीत) हे खासगी वाहन घेऊन दोन दिवसांपूर्वी तिरुपती येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन करून कानिपकमकडे जात असताना चंद्रगिरी मंडळातील नायडूपेट-पुथलापट्टवरील मुख्य रस्त्यावरील दुभाजकावर त्यांची भरधाव कार धडकली. यात अनंत टिंबूरकर, मयूर मुत्तून, ऋषिकेश जंगम, अजय लट्टे यांचा जागीच मृत्यू झाला, तर रोहन, राहुल, नार्लेकर, सुनील, अंबादास हे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने तिरुपती येथील रुईया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य राबविले. चंद्रगिरी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, या अपघाताची छायाचित्रे, व्हिडीओ सोलापुरातील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली. कुमठेकर हॉस्पिटलच्या पाठीमागे या अपघातातील तरुणांचे कुटुंबीय राहत असून, तेथे मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती.



