कळंगुट येथे उघड्यावर कचरा टाकणे एका बांधकाम प्रकल्प मालकाला चांगलेच भोवले आहे. बांधकाम कामाचा आणि इतर कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी कळंगुट पंचायतीने जागीच मालकाला 25 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांना म्हापसाच्या दिशेने उभे असलेले एक संशयित वाहन दिसले. या व्यक्तीने पोरबावड्डो येथे रस्ता आणि शेताच्या बांधावर बांधकाम कचरा टाकला. त्याला विचारण्यात आले तेव्हा नागोवा येथे बांधकाम सुरू असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान सिक्वेरा यांनी या व्यक्तीला कचरा टाकताना रंगेहात पकडले.
सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी तात्काळ पंचायत सचिव अर्जुन वेळीप यांना घटनास्थळी बोलवले तसेच, पोलिसांना देखील याबाबत माहिती देण्यात आली. बांधकाम प्रकल्प मालक जयवंत सिंग यांनाही घटनास्थळी बोलवलून, त्यांना 25 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. पंचायत सचिवाने गोवा नॉन-बायोडिग्रेडेबल कायद्याअंतर्गत ही कारवाई केली.
“या कारवाईमुळे लोकांना बेजबाबदार वर्तण खपवून घेतले जाणार नाही याची जाणीव होईल. तसेतच, अशा पद्धतीने उघड्यावर कचरा टाकल्यास कडक कारवाई केली जाते, असा संदेश लोकांपर्यंत जाईल.” असे पंचायत सचिव वेळीप म्हणाले.
“कचरा उघड्यावर टाकला जातो याबाबत आम्ही पोलिसांकडे अनेक तक्रारी केल्या, नियोजन आणि विकास प्राधिकरण तसेच, उपजिल्हाधिकारी यांच्याकडे देखील तक्रार केली. पण आजवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. आज याठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आले व दंड आकारण्यात आला. शेतात टाकलेला कचरा बाहेर काढला जात नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही,” असे कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले.



